Lok Sabha Election 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासंदर्भात राज्यात विविध प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार, वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढविणार अशा अनेक वावड्या त्यांच्याबाबत उठत आहेत. या सर्व चर्चांना वडेट्टीवार यांच्या सुपुत्री शिवानी वडेट्टीवार यांनी आता पूर्णविराम दिला आहे. शुक्रवारी (ता. आठ) ‘सरकारनामा’शी बोलताना त्यांनी असे सर्व मुद्दे खोडून काढले.
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत. पक्षाने सोपविलेले काम, पक्षाने सोपविलेली जबाबदारी इमानेइतबारे पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न करीत असतो. त्यांनी पक्षाला आणि पक्षाने त्यांना बरेच काही दिले आहे. त्यांची ही एकनिष्ठता पाहून आपल्यालाही बरेच काही शिकायला मिळते. त्यामुळे पक्ष सोडून जाणे वगैरे या सर्व चर्चा तथ्यहीन आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात विजय वडेट्टीवार यांची पकड आहे. अभ्यास आहे. पक्षाकडूनही त्यांना योग्य ते सहकार्य मिळत असते. अशात आमचा संपूर्ण वडेट्टीवार परिवार सर्वसामान्य आणि समाजाच्या हितासाठी झटणे हेच आपले कर्तव्य समजतो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्वसामान्यांच्या वेदनांची जाण विजय वडेट्टीवार यांना आहे. वरकरणी अत्यंत कठोर वाटणारे वडेट्टीवार खऱ्या अर्थाने भावनिक आहेत. लोकांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी पाहिल्यावर अनेकदा त्यांना गहिवरून आल्याचे आपण पाहिले आहे. संवेदनशीलतेचे हेच संस्कार आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपणही राजकारण करण्यापेक्षा समाजकारणावर भर देत असल्याचे शिवानी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. समाजकारण करताना बरेचदा व्यापक लढा द्यावा लागतो. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठी ताकद लागते. बरेचदा सरकारला झुकविण्याची गरज भासते, त्यामुळे समाजकारणाला राजकारणाची जोड द्यावी लागते, असे त्या म्हणाल्या.
विजय वडेट्टीवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचे राज्याच्या राजकीय जगतात वेगळे वलय आहे. कोविड काळात त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जनहितासाठी केलेल्या कामाचा अख्खा महाराष्ट्र साक्षीदार आहे. अशात विनाकारण विजय वडेट्टीवार हे लोकसभा लढणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे शिवानी यांनी स्पष्ट केले. विजय वडेट्टीवार यांचा महाराष्ट्रावरच ‘फोकस’ आहे. राज्यातील जनतेच्या सेवेचे व्रत त्यांनी घेतले आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्रातच खूष असल्याचे ते सांगतात, असे शिवानी म्हणाल्या.
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण काँग्रेसकडे संधी मागितली आहे. अर्थात उमेदवारी देण्याचा निर्णय हा सर्वस्वी पक्षाचा आहे. पक्षाकडे प्रत्येकाच्या कामाचा हिशेब असतो. आपल्या कामाचाही आहे. त्यामुळे पक्षाने संधी दिली तर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी मिळालीच पाहिजे, असा आपला कोणताही अट्टाहास नाही. आपण आपले काम करीत राहणार आहे. परंतु उमेदवारी मिळाल्यास व त्यातून विजय संपादन केल्यास त्याचा फायदा जनतेलाच होणार आहे. सध्या केंद्रात असलेल्या सरकारला सामान्यांचे काहीच देणेघेणे नाही. केवळ काही उद्योगपतींची घरे भरली जात आहेत. जातीय विष पेरले जात आहे. अशात आपल्याला मतदारांनी दिल्लीत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास राज्यात विजय वडेट्टीवार व केंद्रात शिवानी वडेट्टीवार मतदारांसाठी बरेच काही करू शकतात, असा विश्वासही शिवानी यांनी व्यक्त केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.