Vijay Wadettiwar : भाजपमध्ये उपऱ्यांना मान दिला जात आहे आणि खरे कार्यकर्ते काठावर तडफडत ठेवले गेले आहेत, हे आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. नितीन गडकरींसारख्या मोठ्या नेत्यांना जर पहिला मान मिळत नसेल, तर इतरांची ‘गॅरंटी’ काय, असा सवाल करत राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबरदस्त टोला हाणला.
सध्या ‘मोदी की गारंटी’, ही जाहिरात जोरात केली जात आहे. तोच धागा पकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यामुळे वडेट्टीवारांनी ‘मोदी की गारंटी’वर टोला हाणला आहे. आज (ता. 4) नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, माल खाणारे, भ्रष्टाचार करणारे त्यांना हवे असतील, ईडीची चौकशी सुरू असेल अशांना पक्षात घेऊन त्यांचा सन्मान आजकाल भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ‘तू ये रे बाबा तुला मी आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करतो आणि तुझा मान पहिला’, ही भाजपची नीती राहिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकदा थुंकल्यानंतर चाटण्याची भाजपची जुनी सवय आहे. पूर्वी साखर कारखान्यांना भाजपवाले विरोध करत होते आणि आता आम्ही खैरात वाटत आहाेत. हा पैसा जनतेचा नाही का? का हा भाजपच्या मालकीचा पैसा आहे, असा सवाल करीत पूर्वी त्याला विरोध करून घसा कोरडा पडेपर्यंत विरोध करणारे हे लोक आता त्याच साखर कारखान्यांच्या बाजूने बोलू लागले आहेत. थुंकून पुन्हा तेच चाटायची सवय पडली आहे, असे त्यांनी साखर कारखान्यांना केलेल्या मदतीतून दिसून येत आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
प्रशासकाच्या माध्यमातून महानंद घशात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. आर्थिक काही प्रश्न असले तरी सरकार मदत करत असते. असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावरून केलेल्या आरोपावर ते कोणाचाही विनयभंग करू शकतात. त्यांना सत्तेचं कवच आहे, त्यामुळे त्यांना बंधन नाही. आदिवासी महिलेला ते मारू शकतात. कुणालाही शिव्या शाप देऊ शकतात. सत्तेचं कवच असल्याने त्यांना लगाम कोण लगावणार? सत्तेमुळे बेभान झालेले माजलेल्या सांडासारखे हे लोक झाले आहेत. त्यांना वेसण घालणारे कोणी नाही आणि कासराही नाही. त्यामुळे त्यांना आवरणार कोण, हा प्रश्न आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.