नागपूर : स्वातंत्र्यानंतर या देशाला उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. कालपर्यंत देशात जे वैभव होते, त्यासाठी कॉंग्रेसजनांनी आपले आयुष्य वेचले, घरदार सोडले, छातीवर गोळ्या झेलल्या. त्या देश विकणासाठी नव्हे. पण आज मोदी सरकारने सर्व सार्वजनिक उपक्रम विकायला काढले आहेत आणि देशाला पुन्हा पारतंत्र्यात टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे आता देशाला पुन्हा उभे करण्यासाठी कॉंग्रेस सरसावली आहे, असे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आज म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मोहदा येथे कार्यकर्त्यांच्या कॉंग्रेस प्रवेश कार्यक्रमात बोलत होते. यावेळी धानोरकर म्हणाले, या देशाला विकण्याचे काम आता मोदी सरकारकडून सुरू आहे. सर्व सार्वजनिक उपक्रम विकायला काढले आहेत. रेल्वे, एलआयसी, एअरपोर्ट विकायला एवढे सर्व विकल्यानंतर देशात काय राहणार? देशात फक्त गुलामी राहणार आहे. ज्या कॉंग्रेसने हे सर्व उभे करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, घरदार सोडले, छातीवर गोळ्या झेलल्या, त्यांनी हे सर्व भविष्यात अशा प्रकारचे विध्वंसांचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील म्हणून केलेले नाही. त्यामुळे पुन्हा देशाला उभे करण्याचे काम कॉंग्रेसच करू शकते आणि ते करणार आहे.
या कार्यक्रमाला वणीचे माजी आमदार वामनराव कासावार, प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, विवेक मांडवकर, डॉ. मोरेश्वर पावडे, विठ्ठल कुचनकर, आशिष कुलसंगे, यश डाहुले, विकास मांडवकर, संध्या बोबडे, वर्षा आवारी, ज्ञानेश्वर येसेकर, इंदिरा पारखी, लता गावंन्दे, शिंदू मेश्राम, मनीषा किन्नाके, संदेश शंभरकर, सनी विश्वकर्मा, अमोल मेश्राम, प्रफुल मुदपेगवार, रोहित विश्वकर्मा, मारोती दुधकोहळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले की, वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसांत महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. पण सात वर्षानंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही गोष्ट ते पूर्ण करू शकले नाहीत. उलट त्यांनी सामान्यांचे कंबरडे मोडले आणि लहान उद्योजकांना देशोधडीला लावले.
सात वर्षात महागाई एवढी वाढली की लोकांचे जगणे मुश्कील झाले, नोटाबंदीने देशातील छोटे, मध्यम, लघू उद्योग बंद पडले, बेरोजगारी प्रचंड वाढली. काळे कायदे आणून शेतकरी व कामगार देशोधडीला लावले. बँका, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपती मित्रांना विकल्या. समाजा-समाजात भांडणे लावण्याचे उद्योग केले. मोदींच्या राज्यात समाजातील एकही घटक समाधानी नाही. त्यामुळे पुन्हा देशाला उभे करण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.