Chandrapur Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रासप आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज (ता. 26) रॅलीने जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी चंद्रपूरच्या गांधी चौकात जाहीर सभा झाली.
या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, राहुल गांधी आपल्या यात्रेत जेथे-जेथे गेले तेथे-तेथे काँग्रेस फुटली आहे. अशी फुटली-तुटली काँग्रेस आता निवडणूक लढणार आहे.
चंद्रपूर विधानसभा असो, की बल्लारपूर मतदारसंघाच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांनी नेतृत्व करीत राज्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता चंद्रपूरची ही तोफ आतापर्यंत मुंबईत धडाडत होती, आता ती दिल्लीमध्ये धडाडणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
मंचावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी आमदार आशिष देशमुख, खासदार रामदास तडस, आमदार संदीप धुर्वे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, माजी महापौर राखी कंचर्लावार या वेळी उपस्थित होते.
चंद्रपुरातील शिवाजी चौकातील शिवाजी पुतळ्यापासून ही महारॅली निघाली. गांधी चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जात मुनगंटीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करताना चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
चंद्रपूरच्या सर्वंकष विकासासोबतच त्यांनी राज्यातील महत्त्वाचे नेते म्हणून महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांनाही हात घातला आहे. त्यामुळेच महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन दाखल करण्याची पहिली प्रक्रिया चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून होत आहे. पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांच्या नामांकनापासून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
चंद्रपूरच्या उमेदवाराबाबतीत काँग्रेसचा घोळ काल-परवापर्यंत सुरू होता आणि सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी १३ मार्च रोजीच निश्चित झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मतदारसंघात सर्वदूर पोहोचण्याचा प्रयत्न केला. तुलनेत काँग्रेसला तयारीसाठी हे १३ दिवस कमी मिळाले आहेत. आता उर्वरित कालावधीत महाविकास आघाडी महायुतीला कशी टक्कर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.