Discussions Begin : भाजपचे अकोला येथील माजी आमदार डॉ. रणजित पाटील यांना वाढदिवशी राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांमधून मोठे गिफ्ट मिळाले आहे. त्याचे झाले असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ भाजप नेत्यांकडूनही डॉ. पाटील यांना शुभेच्छा देताना ‘आमदार’ असाच उल्लेख करण्यात आला आहे.
भाजपचे ‘जायंट किलर’ नेते गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या पोस्टमध्ये डॉ. पाटील यांचा माजी आमदारऐवजी ‘आमदार’ असाच ठळक अक्षरात उल्लेख केला आहे. त्यामुळे ही पोस्ट तयार करताना चूक झाली की हे भविष्यातील घडामोडीचे संकेत आहेत, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील असे दोन गट आहेत. डॉ. रणजित पाटील यांचा 2023 मधील पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी पराभव केल्यानंतर डॉ. पाटील हे जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. सध्या डॉ. पाटील गट जिल्ह्यातील भाजपच्या कार्यक्रमात फारसा सहभागी होत नाही. डॉ. रणजित पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे आहेत.
आमदारकी नसल्याने सध्या डॉ. पाटील हे ‘बॅकफूट’वर आहेत असे बोलले जात आहे. अशातच आज डॉ . रणजित पाटील यांचा वाढदिवस साजरा होत आहे. निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. पाटील यांचा हा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. शनिवारी (ता. 20) डॉ. पाटील यांना राजकीय मंडळींकडून शुभेच्छा देण्यात आल्या. शुभेच्छा देताना अनेकांनी ‘आमदार’ असाच उल्लेख पाटलांबाबत केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोशल माध्यमातील या पोस्टवरून माजी गृहमंत्री डॉ. रणजित पाटील यांना वाढदिवसाच्या दिवशी मोठी भेट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी आमदार असलेल्या रणजित पाटील भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट दोन्हीकडून ज्या शुभेच्छा देण्यात आल्या, त्या आमदार म्हणूनच देण्यात आल्या. या पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सर्वच पोस्टमध्ये डॉ. पाटील यांचा विधान परिषद सदस्य तथा आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे येत्या काळात डॉ. पाटील यांच्या आमदार होण्याच्या शक्यता अधिक बळावल्याची चर्चा सुरू झाली आहे. थेट ‘आमदार’ म्हणून शुभेच्छा मिळाल्याने डॉ. रणजित पाटील हे ‘जाम’ खुश झाले असतील यात शंकाच नाही. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात अर्जदाराने याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण निकाली निघाले आहे. अशा डॉ. रणजित पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय असल्याने त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास डॉ. पाटील हे पुन्हा सक्रिय होतील, असे म्हणायला काही हरकत नाही.
रणजित पाटील यांच्या वाढदिवसावरून अनेक नेत्यांच्या सोशल मीडियावरील ‘वॉल’ शुभेच्छा संदेशांनी रंगल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भिंत मात्र कोरीच होती. फडणवीस यांच्या सोशल मीडिया ‘वॉल’वरून डॉ. पाटील यांना शुभेच्छा देणारा कोणताही संदेश नव्हता. संदेशच नसल्याने माजी आमदार किंवा आमदार असा उल्लेख तर दूरच होता. फडणवीस यांच्या या सोशल चुप्पीतूनही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.