दिवाळी आली अन् गेलीसुद्धा, पण निराधारांच्या नशिबी अजूनही अंधार...

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत Under Sanjay Gandhi Niradhar Yojana असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे पैसे बँकांना पाठविण्यात आले आहे.
Poor Senior Citizen
Poor Senior CitizenSarkarnama

जलालखेडा : ज्यांच्या ओठातून पूर्ण क्षमतेने शब्द बाहेर पडत नाहीत, चालणेच काय ज्यांना धड उभेसुद्धा राहता येत नाही, शरीरात बळ नाही. थांबण्याची क्षमता नाही, अशा निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांची अलीकडे बँकेत गर्दी होत होती. जेणेकरून त्यांचे मानधन येईल व दिवाळी साजरी करता येईल. दिवाळी आली अन् गेलीसुद्धा, पण निराधारांच्या नशिबी अजूनही अंधारच आहे.

ज्यांचा कोणी आधार नाही, अशा निराधारांचा उदरनिर्वाह शासनाच्या मानधनावर चालतो. ते बिचारे मागील काही दिवसांपासून बँकेच्या चकरा मारत आहेत. बँकेत जाऊन साहेब दिवाळी आहे, आमचे पैसे आले का, अशी विचारणा वृद्ध, निराधार करीत होते. चेहऱ्यावर सुरकुत्या अन् चिंतेचे सावट केविलवाण्या शब्दांत विचारणा करतात, साहेब आमचे पैसे आलेत काय जी? अनुदान पाठविल्याचे आम्ही ऐकले आहे. दिवाळीचा सण साजरा झाला, पण निराधारांची दिवाळी अंधारातच गेली.

तसे तर ते अर्धवट निराधार सरकारी शिक्का लागल्याने ते पूर्णतः निराधाराच्या श्रेणीत आले. गेल्या चार महिन्यांचे विविध सरकारी योजनांचे अनुदान थकले आहे. निराधारांना दिवाळीपूर्वी आधार देण्याचे निर्देश शासनाचे आहेत. त्यामुळे निराधारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण अद्यापही त्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांच्या दिवाळी सणावर आर्थिक संकटाचे सावट पसरले होते. कुटुंबाचा आधार गेला.... आयुष्यात अंधार पसरला. जगण्याचे सर्व मार्ग बंद झाले. कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न उभा झाला. तेव्हा निराधारांचा आधार म्हणून संजय निराधार योजना ठामपणे उभी राहिली.

निराधारांना जगण्याचे बळ मिळाले. मुलांच्या शिक्षणासाठी आधारवड ठरला. मात्र, आज अनेकांच्या आयुष्यात अंधार पसरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीही अंधारात जाईल, अशी भीती त्यांना वाटते आहे. कारण मागील ४ महिन्यांपासून संजय निराधार योजनेचे मानधन थकले आहे. परंतु पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन निराधारांना दिवाळीपूर्वी मानधन पोहोचेल, अशी व्यवस्था करावी, असे निर्देश दिले. त्यामुळे निराधारांनी बँकेत एकच गर्दी केली आहे. पण त्यांच्या खात्यात पैसे मात्र जमा झाले नाही.

निराधारांचा एकमेव आधार म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेंतर्गत असलेल्या विविध योजना आहे. यात नरखेड तालुक्यातील हजारो लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत प्रतिमाह एक हजार रुपये मानधन मिळते. गेल्या चार महिन्यांपासून या योजनेचे अनुदान थकले. मे नंतर अनुदानाचे वाटप झालेच नाही. इतरांप्रमाणे त्यांनाही दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे अशी अपेक्षा त्यांना आहे. मुले असूनही काहींना निराधाराचे जीवन जगावे लागते. त्यांचा आधार हिरावला असला तरी संजय गांधी निराधार योजना त्यांचा आधार बनली आहे. नियमित अनुदान मिळावे, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. तांत्रिक कारणामुळे विलंब झाला तरी अनुदान मात्र मिळते, हेही तेवढेच सत्य आहे. योजनेचा लाभ गरजूंना मिळावा योजनेत पारदर्शकता असावी, यासाठी सारी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. सर्व लाभार्थ्यांना आता बँकेतूनच अनुदान मिळते.

निराधार योजना समितीची अद्याप स्थापना नाही..

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पालकमंत्री व स्थानिक आमदार संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करतात. यात अध्यक्ष नियुक्त केल्या जातो. पण विधानसभा निवडणूक होऊन दोन वर्ष लोटली, तरी समिती मात्र स्थापन करण्यात आली नाही, हे विशेष.

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे पैसे बँकांना पाठविण्यात आले आहे. पैसे त्वरित त्यांच्या खात्यात जमा करून त्यांना वाटप करण्यात यावे, जेणेकरून त्यांना दिवाळी साजरी करता येईल, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.

-डी.जी.जाधव, तहसीलदार, नरखेड.

Poor Senior Citizen
मी वृक्ष पाहायला आलो होतो; पण वृद्ध भेटले : बच्चू कडू

निराधारांचे पैसे अजूनही त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यांच्या खात्यात neft द्वारे निधी जमा केला जातो. पण अद्याप तरी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने त्यांना पैसे देता येणार नाही.

-मनीष गजभिये, बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, शाखा भारसिंगी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com