डॉ. अशोक जीवतोडे : शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, राजकारणी आणि कर्तबगार नेता

आपण कर्तबगार आणि लोकप्रिय आहोत, याचा अनेकांना अहंकार येतो, पण अशोक जीवतोडे Ashok Jivtode, Chandrapur यांना अहंकाराचा ‘अ’देखील स्पर्शून गेला नाही.
Dr. Ashok Jivtode, Chandrapur.
Dr. Ashok Jivtode, Chandrapur.Sarkarnama
Published on
Updated on

प्रा. रवी वरारकर

चंद्रपूर : शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्यानंतर, समाजासाठी काही करावे या हेतूने सामाजिक सेवेत स्वतःला वाहून घेतलेले चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रिय समाजसेवक म्हणजे अशोक श्रीहरी जीवतोडे. अशोक भाऊंना शिक्षण क्षेत्रातली खडान् खडा माहिती. त्यांच्या बोलण्यात नेहमी नवनव्या संकल्पनांची चर्चा असते. सतत काहीतरी नवीन घडविण्याच्या ध्यासाने ते भारलेले असतात. राजकारणातील त्यांचा वावर तेवढाच समर्थ आहे. पण एखाद्या आंदोलनात किंवा संवादात ते रमतात, तेव्हा ते राजकारणी अजिबात भासत नाहीत. त्यांच्यातील मैत्रभावही तेवढाच जबरदस्त. आपण कर्तबगार आणि लोकप्रिय आहोत, याचा अनेकांना अहंकार येतो, पण अशोक जीवतोडे यांना अहंकाराचा ‘अ’देखील स्पर्शून गेला नाही.

शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, राजकारणी आणि कर्तबगार नेता, अशी ओळख मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या माणसांची साथ कधी सोडली नाही. त्यांना जवळ केले आणि टिकविले. सतत नवनवीन लोकांचा संग्रह आणि विविधतेचा ध्यास हा त्यांचा स्वभावच असावा कदाचित. त्यामुळेच त्यांनी शिक्षण क्षेत्रात पूर्व विदर्भात नवनवीन प्रकल्पांना आकार दिला आणि ते पूर्णत्वास नेले. घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी झटणारे अशोक भाऊ सर्वांनाच आपलेसे वाटतात. त्यातूनही वेळ मिळेल तेव्हा कुटुंबीयांसोबत रमतात. तरीही लोककल्याणाचा त्यांचा ध्यास काही केल्या कमी होत नाही. भाषणांमध्ये ते जेव्हा आकडेवारीसह बारीकसारीक तपशील सांगतात, तेव्हा त्यांच्या स्मरणशक्तीची दाद दिल्याशिवाय श्रोते राहात नाहीत. लोककल्याणाच्या त्यांनी घेतलेल्या ध्यासाचे समाधान वाटते.

पूर्व विदर्भातील शैक्षणिक चळवळीचे जनक माजी आमदार स्व. श्रीहरी बळीराम जीवतोडे गुरूजी हे १९६७ ते १९७२ या काळात विधानसभेत विरोधी पक्षांची भूमिका पार पाडणारे लोकप्रिय जनप्रतिनिधी होते. ते शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात क्रांतिकारक आणि धडाडीचे निर्णय घेणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व नागपूर जिल्हयात मोठा चाहता वर्ग आहे. या जिल्ह्यातील लोकांशी डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांचे अतिशय आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पूर्व विदर्भातील गोंडवन, आदिवासी दुर्गम भागातील शैक्षणिक क्रांतीचे जनक शिक्षण महर्षी स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजींचे चिरंजीव तथा चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरचे विद्यमान सचिव, प्राचार्य डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे.

शैक्षणिक, राजकीय, सामाजिक वातावरणात वावरणाऱ्या कुटुंबात १९ जून १९६१ला अशोकरावांचा जन्म झाला. २००९ मधील नागपूर पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीत सक्रिय सहभाग घेऊन जवळपास ३० हजार पदवीधर मतदारांची नागपूर जिल्ह्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात मतदार नोंदणी केली व त्याची नोंद अनेक मान्यवरांनी घेऊन डॉ. अशोक जीवतोडे यांचा गौरव केला. २००२, २००८, २०१४ व २०२० च्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ते सक्रिय होते. यावेळी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाची दाणादाण उडविली. यात अशोक जीवतोडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असल्याने तिन्ही विभागांत शिक्षक मतदारसंघात ते नेहमी सक्रिय असतात. २००४ मध्ये त्यांचे लहान भाऊ स्व. संजय श्रीहरी जीवतोडे नंदोरी कोकेवाडा जिल्हा परिषद सर्कंलची निवडणूक जिंकले. यामध्ये अशोकरावांनी उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय भद्रावती-वरोरा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. या मतदारसंघाचा निकाल देशाला माहिती आहे. २००४, २००९, २०१४, २०१९ च्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत डॉ. जीवतोडे यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून राज्यभर व देशभर उत्कृष्ट कार्य ते करीतच आहेत. ओबीसी समाजात जागृतीचे व संघटनाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. नागपूर, दिल्ली, मुंबई, हैदराबाद व इतर ठिकाणी ओबीसीच्या राष्ट्रीय अधिवेशनात डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा सक्रिय सहभाग असतो. ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर १६ डिसेंबर २०१८ रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये डॉ. जीवतोडे अग्रस्थानी होते. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांतून ओबीसी बंधूभगीनींचा लाखोंच्या संख्येने त्यात सहभाग होता. ओबीसी महासंघाच्या या मोर्चानंतर राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली व ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागले. ओबीसी समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून त्यांनी त्या पूर्ण करून घेतल्या.

विदर्भाचा विकास झपाट्याने कसा होईल, याचा विचार करून विदर्भवादी भूमिका घेऊन विदर्भवादी जनतेमध्ये जनजागृती घडून यावी म्हणून विविध मार्गदर्शन व व्याख्यानांचे आयोजन करून जनजागृती त्यांनी केली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळता याव्या, यासाठी जनजागृती व्हावी म्हणून विदर्भ आणि मध्यप्रदेशात ठिकठिकाणी जनजागृती सभा घेतल्या. आत्महत्याग्रस्त शेतकरी व नक्षल पिडीत कुटुंबीयांच्या पाल्यांना संस्थेच्या शाळा महाविद्यालयांत मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी केली. विशेषतः: विदर्भ आणि मध्यप्रदेशात शेतकरी समाजाची विदर्भभर आणि मध्यप्रदेशात ‘सहविचार सभा’ घेऊन जनजागृती घडवून आणली.

चंद्रपूर भव्य आणि विस्तीर्ण प्रांगणात घेतलेल्या राज्यस्तरावरील शेतकरी समाजाच्या सहविचार सभेला विदर्भ आणि मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सहविचार सभेला १,००,००० शेतकरी बांधवांची उपस्थिती म्हणजे जनतेचा विश्वास आणि केलेल्या कार्याची पावती समजली गेली. विदर्भस्तरीय विविध समाजांचे वधू-वर परिचय मेळावे. गुणवंत गौरव पुरस्कार आणि विविध ठिकाणच्या मेळाव्यांना मार्गदर्शक म्हणून ते आवर्जून उपस्थित राहतात. समाजामध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता, विशेषतः तरुण पिढी यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्वस्त होताना दिसत आहे. जिल्ह्यातील विविध गावं आणि शहरांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन ते सातत्याने करीत असतात.

दरवर्षी संस्थेच्या व स्व. जीवतोडे गुरुजी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जिल्हाभरात आणि जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, संवर्धन व रक्तदान शिबिरांचे चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्हयात आयोजन करण्यात येते. वृक्षलागवडीमध्ये सहभाग घेणाऱ्या इतर सामाजिक संघटनांना वृक्ष आणि बियाणांचा मोफत पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात विशेषतः अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन नियमित केले जाते. संस्थेअंतर्गत तसेच संस्थेबाहेर विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रोत्साहन, विशेषतः संशोधन कार्य, साहित्य प्रकाशन, चित्रकला, रंगकर्मी, पत्रकारिता आदी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन आणि सर्व प्रकारची मदत केली जाते. समाजप्रबोधन तथा अंधश्रद्धा निर्मूलन ः शेतकऱ्यापाठोपाठ नैराश्यातून विद्यार्थ्यामध्ये घडून येत असलेल्या आत्महत्या भावी पिढीसाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या आहेत. व्यसनाधीनता व वाढत असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी, म्हणूनच राष्ट्रीय कीर्तीचे विविध प्रबोधनकार, कीर्तनकार यांचे प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून ५०,००० लोकांची उपस्थिती असते. अंधश्रद्धा निर्मूलनार्थ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष स्व. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि अन्य मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन त्यांनी आजवर केलेले आहे.

शैक्षणिक कार्य ः मागील ३५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्राचा त्‍यांचा दांडगा अनुभव आहे. प्राध्यापक ते प्राचार्य विद्यार्थिप्रिय, पालकप्रिय व निष्कलंक चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व, अशी ओळख अशोकरावांनी आपल्या कर्तृत्वातून मिळविली आहे. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाचे अध्यक्ष आहेत. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी अध्यक्ष तथा अधिष्ठाता, नामनियुक्त सदस्य, शिक्षण अभ्यासमंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य व प्राध्यापकांच्या संघटनेद्वारे होणाऱ्या कार्यात डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा सक्रिय सहभाग नेहमीच असतो. पूर्व विदर्भातील गोंडवन, आदिवासी, दुर्गम भागातील शैक्षणिक क्रांतीचे जनक शिक्षणमहर्षी स्व. श्रीहरी बळीराम जीवतोडे गुरुजींचे चिरंजीव तथा चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्हयात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या विदर्भातील अग्रगण्य अशा नावाजलेल्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर या संस्थेचे मागील २७ वर्षापासून सचिव म्हणून प्रशंसनीय संघटन कार्य ते करत आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com