महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून सध्या घमासान सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री दररोज काही ना काही भडकावू वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते खासकरून महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले आहे. अशातच महाराष्ट्रातील काही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पण यामध्ये शिंदे गटाच्या खासदारांचा समावेश नव्हता. या बाबतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, शिंदे गटाचे खासदार अमित शहांना नेहमीच भेटतात, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि काही कार्यक्रमांसाठी काल नागपूरमध्ये (Nagpur) आले असताना विमानतळावर (Nagpur Airport) फडणवीस यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि मेट्रो टप्पा दोन हे दोन नागपूरचे मोठे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने रोखले होते. आम्ही सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पांना तत्काळ केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवून दिली, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली.
मेट्रो आणि नागनदीचे प्रकल्प सुमारे अडीच वर्षांपूर्वीच केंद्र सरकारकडे पाठविले होते. त्यातील त्रुटी महाविकास आघाडीने दूर केल्या नाहीत. या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले. आम्ही सत्तेत आल्यानंतर तत्काळ सर्व त्रुटी दूर केल्या आणि प्रकल्पांना मंजुरी मिळवली. हे दोन्ही प्रकल्प नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत, असे फडणवीसांनी सांगितले.
समृद्धी, नागनदी आणि मेट्रो या तीनही प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, ही चांगली गोष्ट आहे. राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन ते भेटले असतील तर अधिक चांगलेच आहे. या भेटीत शिंदे गटाचे खासदार गेले नाही, याकडे लक्ष वेधले असताना फडणवीस म्हणाले, ते नेहमीच त्यांना भेटत असतात.
हिवाळी अधिवेशनाला १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात लव्ह जिहाद कायदा आणणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले अद्याप याचा निर्णय झालेला नाही. मात्र आम्ही वेगवेगळ्या राज्यांच्या कायद्यांचा अभ्यास करीत आहोत. सर्वंकष विचार करून कायद्याचा निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.