Shiv Sena : आपल्या विविध वक्तव्यांनी संपूर्ण राज्यभर नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे अडचणीत आले आहेत. 1987 मध्ये वाघाची शिकार केली होती आणि आपल्या गळ्यातील हारात वाघाचा दात असल्याचा दावा करणे गायकवाडांना भोवणार असल्याचे दिसून येत आहे. शिवजयंतीच्या दिवशी स्वतःच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे नुकतेच जबाब नोंदवलं आहे. याशिवाय आमदार यांच्या गळ्यातील ती वाघदातसदृश वस्तूसुद्धा वन विभागाचे पथकाने जप्त केल्याने बुलडाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाघाचा दातसदृश वस्तू वन विभागाने ताब्यात घेत डेहराडून येथील ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट’मध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा वन विभागाने दिली.
बुलडाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी बुलडाणा शहरातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून, 1987 मध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य केले होते. हा व्हिडिओ सध्या व्हायरलही होत आहे. यासंदर्भाने प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांचे बयाण नोंदविले आहे. आता यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा दात खरंच वाघाचा असेल तर यामध्ये तीन वर्षांची शिक्षासुद्धा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार गायकवाड यांनी बुलडाण्यात दावा केल्या गेलेली दातसदृश वस्तूही वन विभागाने ताब्यात घेतली आहे. आता ही वाघ दातसदृश वस्तू ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट इंडिया’ डेहराडून येथे डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तेथून यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता डेहराडून येथील संस्थेचा नेमका काय अहवाल येतो, याकडे सध्या लक्ष लागून राहिले आहे. डेहराडून येथून अहवाल आल्यानंतर तो वाघाचा दात निघाल्यास संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढणार आहेत. दात न निघाल्यास संजय गायकवाड यांचे बोलणे किती गांभीर्याने घ्यायचे, असा प्रश्न अनेकांना पडणार आहे.
प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे अवयव वापरण्यावर बंदी आहे. कोणीही अशा प्रकारचे वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये. तसे आढळून आल्यास त्यावर शिकारीचा गुन्हा दाखल होतो. 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी जी मुलाखत दिली, त्याच्या चित्रफितीच्या आधारे वन विभागाने दात जप्त केला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वाघाचे नख, दात इत्यादी अवयव परिधान करणे सिद्ध झाले तर ते शिकारीचा गुन्हा होणार आहे. त्यात तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे बुलडाण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी सांगितले.
कोणतेही वक्तव्य केल्यानंतर कोणत्याही परिणामांची चिंता न करता त्यापासून माघारी न घेणाऱ्यांपैकी बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र, या प्रकरणात माध्यमांनी जेव्हा वन विभागाच्या कारवाईसंदर्भात आमदार संजय गायकवाड यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.