गडचिरोली : अहेरीत आविसं बनला किंगमेकर, राजपरिवारांसाठी धोक्याची घंटा...

राजकारणाचे सत्ताकेंद्र म्हणून गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अहेरी राजनगरी प्रसिद्ध आहे. राजे विश्वेश्वरराव, राजे सत्यवान व आता त्यांचा वारसा चालविणारे राजे अम्ब्रिशराव महाराज आहेत.
Dharmarao Baba Atram, Deepak Atram and Ambrashrao
Dharmarao Baba Atram, Deepak Atram and AmbrashraoSarkarnama

अहेरी : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राजनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी नगरपंचायतीचा निकाल राजपरिवारातील काका-पुतण्याच्या राजकारणाला छेद देणारा ठरला आहे. आतापर्यंत या दोघांमध्येच राजकीय (Politics) आखाड्यात स्पर्धा असताना आदिवासी विद्यार्थी संघाने येथे ५ जागा जिंकत सत्तेतील आपली महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे. त्यामुळे ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा' अर्थात आतापर्यंतचे पारंपरिक राजपरिवारीय राजकारण सोडून नव्याने डावाला सुरुवात करा, असाच संदेश या निकालाने दिल्याचे दिसून येत आहे.

अहेरी नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ३, भारतीय जनता पक्षाला ६, शिवसेना पक्षाला २, आदिवासी विद्यार्थी संघाला ५ आणि अपक्ष १ अशी स्थिती आहे. यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. पण किंगमेकरच्या भूमिकेत आदिवासी विद्यार्थी संघटना दिसत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण अहेरी येथून चालविले जाते. राजकारणाचे सत्ताकेंद्र म्हणून गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अहेरी राजनगरी प्रसिद्ध आहे. राजे विश्वेश्वरराव, राजे सत्यवान व आता त्यांचा वारसा चालविणारे राजे अम्ब्रिशराव महाराज आहेत. दुसरे राजघराण्यातील मोठे नाव म्हणजे माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम. या दोन राजघराण्यांव्यतिरिक्त अहेरी राजनगरीत दुसर्‍या कोणत्याही पक्ष, संघटनेने निवडणूक लढवली नाही.

त्यांच्याविरोधात डोके वर काढण्याची हिंमत केली नाही. ग्रामपंचायतीपासून या दोनच राजपरिवारची सत्ता आलटून पालटून येत होती. पण २०२२ची नगरपंचायत निवडणूक ही यासाठी अपवाद ठरली. माजी आमदार दीपक आत्राम यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आविसंने एकूण १७ पैकी १२ प्रभागांत आपले उमेदवार निवडणुकीत उतरविले. प्रथमच त्यांचे ५ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले. यातून आविसंने आपले राजनगरीत अस्तिव असल्याचे सिद्ध केले. विशेष म्हणजे आविसंचे दोन उमेदवार अवघ्या १५ ते २० मताचे फरकाने पराभूत झाले. नाही तर चित्र पुन्हा वेगळे असते. ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती.

अहेरीत पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी संयुक्त प्रचार सभासुद्धा घेतली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, सेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनीसुद्धा प्रचारसभा घेत निवडणुकीत रंगत आणली होती. त्यांनी स्वत: काही प्रभागांत जाऊन मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. पण, त्यांच्या पदरी यावर्षी निराशाच आली. त्यांचे केवळ सहा उमेदवार निवडून आले. मागील निवडणुकीत भाजपचे आठ नगरसेवक निवडून आले होते. पाच वर्षे अहेरीत भाजपची सत्ता होती, हे विशेष. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनाही या निवडणुकीत धक्का बसला. त्यांचे केवळ तीन नगरसेवक निवडून आले, तर मित्रपक्ष शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आलेत. मागील नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले होते. यावेळी त्यांचे संख्याबळ दोनने कमी झाले. शिवसेनेसोबतच्या युतीचा त्यांना फारसा फायदा न होता उलट नुकसानच झाले.

Dharmarao Baba Atram, Deepak Atram and Ambrashrao
आत्राम कुटुंबाला पवारांची मोठी भेट...

किंगमेकरच्या भूमिकेत आविसं...

आविसंकडे केवळ ७ जिल्हा परिषद सदस्य असताना अजय कंकडालवार यांनी सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्यचकित करत जिल्हा परिषदेवर आविसंची सत्ता आणली. ते स्वतः जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून विराजमान आहेत. जे मोठमोठ्या धुरंधर नेत्यांना जमले नाही ते अजय कंकडालवार यांनी करून दाखविले. जिल्ह्याच्या राजकारणात आपले पाय अधिक घट्ट रोवले. अशीच स्थिती आता नगरपंचायत निवडणुकीत निर्माण झाली आहे. हा अहेरी येथील राजपरिवाराला धोक्याचा इशाराच समजायला हरकत नाही. त्यांनी १२ प्रभागांत आपले उमेदवार उभे करून त्यांना भक्कम पठिंबा देत विरोधकांना घाम फोडला. ५ नगरसेवक निवडून आणले. सिरोंचा नगरपंचायतीवर १० नगरसेवक निवडून आणत आविसंने एकहाती सत्ता मिळविली. एटापल्ली, मुलचेरा, भामरागड व अहेरी येथेही आविसं किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com