Gondia ACB Trap : बांधकाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणे गोंदिया जिल्ह्याच्या वडेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी अपर आयुक्तांनी (नागपूर) चौघांनाही पुढील आदेशापर्यंत निलंबित केल्याने ग्रामपंचायत क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सरपंच रीना हेमंत तरोणे, उपसरपंच दिनेश सुनील मुनेश्वर, ग्रामपंचायत सदस्य मार्तंड मन्साराम मेंढे व लोपा विजय गजभिये अशी लाचखोरीच्या आरोपात निलंबित करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत.
गोंदिया जिल्हाच्या सडक-अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायत वडेगाव येथे ग्रामपंचायतअंतर्गत विविध बांधकाम करण्यासाठी बांधकाम साहित्य पुरवठाधारकांची निविदा मंजूर करण्यात आली होती. ग्रामपंचायत निविदेनुसार रूपचंद मेंढे ते माणिक हत्तीमारे यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण, मातामाय मंदिर ते घोडीपर्यंत रस्ता खडीकरण व अंगणवाडी क्रमांक एक व चार येथे ‘पेव्हर ब्लॉक’ बसविण्यासाठी बांधकाम साहित्य पुरवठादारांनी पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याचे मंजूर बिलाचे 15 लाख 55 हजार 696 रुपये घ्यायचे होते. बिलाच्या रकमेचा चेक देण्यासाठी 5 टक्के प्रमाणे 75 हजार रुपयांची मागणी सरपंच रीना तरोणे, उपसरपंच दिनेश मुनेश्वर यांनी पुरवठादाराकडे केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुरवठादाराला मागितलेली रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे त्यांनी 26 जुलै 2023 रोजी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन शासकीय पंचाकडून पडताळणी केली. त्यावेळी सरपंच व उपसरपंचांनी पंचांसमक्ष तडजोडीअंती 70 हजार रुपयांची मागणी केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून 19 ऑगस्ट 2023 रोजी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली. पोलिसांनी प्रकरण न्यायालयात दाखल केले.
लाचेच्या या प्रकरणात न्यायालयाने आरोप असलेल्यांना नोटीस बजावून सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. परंतु संबंधितांना दोन वेळा नोटीस मिळूनसुद्धा ते प्रकरणात उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामअधिनियम 1958 कलम 39-1 नुसार सरपंच, उपसरपंच व दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या कृत्यामुळे जनमानसात शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांनी आपले कर्तव्य पार पाडताना गैरवर्तणूक व लज्जास्पद कृत्य केल्याचे दिसून येत असल्याने पुढील कालावधीसाठी त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात ग्रामपंचायत क्षेत्रात प्रथमच सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांना लाच स्वीकारण्याच्या आरोपात अपात्र ठरविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.