नागपूर : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या जिल्ह्यात सुरजागडच्या खाणकामाला नक्षल्यांचा विरोध आहे. त्यासाठी त्यांनी यापूर्वी जाळपोळही केली आहे. आता तर त्यांनी पालकमंत्री शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकीचे पत्र एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले असल्याचे सांगण्यात येते.
शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यापासून ते नियमित जिल्ह्याचा दौरा करतात. तेथील अनेक नक्षल्यांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यामुळे गडचिरोली आणि राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षलवादी त्यांच्या चिडलेले आहेत. जिल्ह्यात विकास कामे करू नका, तुमच्या कामांमुळे आम्हाला मिळणाऱ्या पैशाचा ओघ थांबला आहे. विकास कामे करू नका, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ, अशी धमकी नक्षल्यांनी पत्रातून दिल्याचे सूत्र सांगतात. तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून आमचे अनेक साथीदार शहीद झाले. त्याचा बदला आता आम्ही घेणार, असेही पत्रात नमूद असल्याची माहिती आहे.
आमचे साथीदार एकट्या गडचिरोली जिल्ह्यातच नाही, तर सर्व शहरांमध्ये आहे. तुमच्या आसपास ते फिरत आहेत, याची जाणीव तुम्हाला नाही. नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याची जी भाषा तुम्ही करता, ते शक्य नाही. कारण देशातील अनेक राज्यांत आम्ही आहोत. तुम्हीच काय कुणीही आम्हाला संपवू शकत नाही, असे पत्रात नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याचा तपास सुरू केल्याची माहिती आहे. मंत्री शिंदे यांना हे पत्र कुणी पाठवले, येथून तपासाची सुरुवात करण्यात आली आहे.
एक महिन्यापूर्वीच पाठवले होते धमकीचे पत्र ?
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पाच्या आड कुणीही आलेले खपवून घेणार नाही, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी जवळपास महिनाभरापूर्वी केले होते आणि सुरजागडमधे खाणकाम करण्याला नक्षल्यांचा विरोध आहे. तेव्हाच नक्षल्यांनी पत्र पाठविले असल्याची चर्चा गडचिरोली जिल्ह्यात आहे. एक महिन्यापूर्वीच धमकीचे पत्र पाठवले होते, तर मग आता त्याची तक्रार का देण्यात आली, याचे उत्तर मात्र जिल्हावासीयांकडे नाही.
घाबरत नाही, उद्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर जाणार..
मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून अशा अनेक धमक्या मला आलेल्या आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे कुणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही. उद्या पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. नक्षल्यांसह जिल्ह्यातील मागासलेल्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे. त्यामध्ये कुणीही आडकाठी आणू शकत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी धमकीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.