Black Magic : सत्तेसाठी जादुई वस्तू आणल्या गाठोडीत, अंधश्रद्धा कायद्यामुळे यावे लागले अडचणीत

Election : शिक्षण संस्थेतील निवडणूक जिंकण्यासाठी असाही प्रताप
black magic
black magicgoogle
Published on
Updated on

Chandrapur News : अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, असे विज्ञानवादी लोक घसा कोरडा हाेईपर्यंत ओरडून सांगतात. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कायदाही अस्तित्वात आला. तरीही लोक एखादे काम करून घेण्यासाठी कुण्या बुवाबाजीच्या नादी लागतील हे सांगता येत नाही. असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला. एका शैक्षणिक संस्थेची निवडणूक जिंकण्यासाठी संचालिकेने आपल्या तीन नातेवाइकांच्या मदतीने काही लोकांच्या घरात अशा काही वस्तू पेरल्या की, त्यामुळे वस्तू ठेवणारे सर्व जण चांगलेच अडचणीत आले आहेत. (In Chandrapur, the director of an educational institution was accused of keeping items related to black magic)

राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानची निवडणूक नुकतीच पार पडली. या प्रतिष्ठानच्या वतीने अनेक शाळा चालविण्यात येतात. संस्थेत संचालक म्हणून अविनाश जाधव, अरुण धोटे, सुमन मामुलकर, डॉ. एस. एम. वरकड, माजी आमदार सुदर्शन, प्रा. बी. यू. बोर्डेवार, मेघा नलगे, दत्तात्रय येगीनवार, राजेंद्र जाधव कार्यरत आहेत. संस्थेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने धर्मादाय आयुक्तांनी नियमानुसार १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक घेतली.

निवडणुकीत विजय मिळावा म्हणून ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान संचालिका मेघा नलगे यांनी आपल्या तीन नातेवाइकांच्या मदतीने अविनाश जाधव, अरुण धोटे, डॉ. एस. एम वरकड, दत्तात्रय येगीनवार, प्रा. बी.यू. बोर्डेवार यांच्या घरी जादुटोण्यात वापरण्यात येणारे विविध साहित्य ठेवल्याचा आरोप झाला. एका संचालकाच्या घरात सीसीटीव्ही फुटेज तपासताना हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे इतर संचालकांनीही आपापल्या घरात तपासणी केली. त्यावेळी त्यांनाही घरी तशाच वस्तू आढळल्या.

सापडलेल्या वस्तूंमुळे संचालकांचे कुटुंबीय चांगलेच घाबरले. ज्यांच्या घरात वस्तू सापडल्या त्या संचालकांनी राजुरा पोलिस ठाणे गाठले. संस्थेच्या निवडणुकीत यश मिळावे, या हेतूने मेघा नलगे व त्यांच्या तीन नातेवाइकांनी हे कृत्य केल्याचा आरोप या संचालकांनी केला. या प्रकाराची त्यांनी तक्रारही दाखल केली. जादुटोणाविरोधी कायद्यान्वये कारवाईची मागणी तक्रारकर्त्यांनी केली. तक्रार नोंदवून घेत राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पारधी यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही महिला तक्रारकर्त्या संचालकांच्या घरी येऊन पिण्याचे पाणी मागत असल्याचे दिसले. गृहिणी पाणी आणायला गेल्यावर त्या महिला हे कथित जादुई साहित्य घरात ठेवताना दिसतात. या महिलांची चौकशी केल्यानंतर त्यांनी संस्थेच्या संचालिका मेघा नलगे यांच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याचे सांगितले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. राजुरा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकार्डिंग, जादुटोण्याचे कथित साहित्य केले आहे. अद्याप प्रकरण तपासात आहे. दरम्यान, ज्या संस्थेच्या निवडणुकीवरून हे सर्व आरोप-प्रत्यारोप झालेत. त्या अध्यक्षपदावर अविनाश जाधव विजयी झालेत व मेघा नलगे यांनी आक्षेप नोंदवित निवडणूक बैठकीतून ‘वॉक आऊट’ केले.

(Edited by : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com