Kishor Jorgewar : नागपूर शहराशी माझ्या बालपणीच्या आठवणी जुळल्या आहेत. दहा वर्षांचा असताना येथील रुग्णालयात मी उपचार घेतला आहे. परिस्थिती इतकी हलाखीची होती की, येथील बस स्थानकावर रात्र घालविली आहे. मीठ-पोळी खाऊन अम्माच्या खांद्यावर निजलो आहे. अशा थरारक आठवणी या शहराशी जुळल्या असताना आज याच शहरात अम्माचा सत्कार होताना पाहून डोळ्यांत पाणी आले, अशा भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केल्या.
सकाळ समूहाच्या वतीने ‘सकाळ‘च्या विदर्भ आवृत्तीच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात गंगूबाई (अम्मा) जोरगेवार यांचा समाज सेवेतील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. चंद्रपूरची अन्नपूर्णा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गंगूबाई ऊर्फ अम्मा जोरगेवार या चंद्रपूर शहरातील गरीब, बेघर, गरजू व्यक्तींना ‘अम्मा का टिफिन‘ उपक्रमाद्वारे जेवण पुरवत आहेत. या उपक्रमांतर्गत दिवसाला सुमारे १७५ टिफिन मोफत दिले जातात. या उपक्रमामुळेच त्यांना चंद्रपूरची अन्नपूर्णा म्हणून ओळख मिळाली आहे.
या सत्कार सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार उपस्थिती होते. अम्माला सन्मानित होताना पाहून त्यांचे डोळे आनंदाने पाणावले. यावर त्यांना विचारणा केली असता, ‘सरकारनामा’शी बोलताना ते म्हणाले की, बालपणीच्या आठवणी मनात खोलवर रुजतात. त्यामुळे नागपूर शहरात आलो की बालपणी सहन केलेले त्रासदायक दिवस आठवायचे. पण आता एक आनंदाचा क्षणही याच शहराने मला दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कष्ट करून, वेदना सहन करत आम्हाला आत्मसन्मानाने जगणे शिकवणाऱ्या माझ्या अम्माचा सत्कार होताना पाहता आले, यापेक्षा मोठा सुखाचा क्षण कोणताच नाही असे आमदार जोरगेवार म्हणाले. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा राजकीय, सामाजिक प्रवास एखाद्या सिनेमाच्या पटकथेला साजेल असाच राहिला आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांचा त्यांच्या मातोश्री अम्मा म्हणजेच गंगूबाई जोरगेवार यांनी फूटपाथवर टोपल्या विकून सांभाळ केला.
भल्या मोठ्या जोरगेवार कुटुंबाचा सांभाळ करत असताना अम्माच्या आयुष्यात अनेक संकटे आली. पती गजानन यांच्या निधनानंतर तर अम्माची कुटुंबाची जबाबदारी आणखी वाढली. यातच सन 1978 ला किशोर जोरगेवार केवळ 10 वर्षांचे असताना त्यांचा अपघात झाला. यात त्यांच्या पायाला इजा झाली. चंद्रपुरात उपचार होणे शक्य नसल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे रक्त न मिळाल्याने 7 वेळा त्यांच्यावरील शस्त्रक्रिया थांबली. पाय गमवण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.
अम्मांनी हिंमत हारली नाही, परमेश्वराचीही कृपा झाली आणि किशोर यांच्यावर उपचार झाले. मात्र, यात त्यांना अपंगत्व आले. नागपूर येथील उपचारादरम्यानचे दिवस जोरगेवार कुटुंबीयांसाठी थरारक राहिले. या काळात मुलाला मीठ-पोळी चारून अम्माने दिवस काढले. एकदा नागपूरच्या बस स्थानकावर रात्र काढावी लागली. असे अनेक अनुभव किशोर जोरगेवार यांचे नागपूर शहरातील आहेत.
अम्माने कष्ट केले. कधी हार मानली नाही. तिने आम्हाला दिलेल्या शिकवणीमुळेच आज जोरगेवार कुटुंब आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मोठे झाले आहे. अम्मा या सन्मानास पात्र आहेत. एकेकाळी मी मीठ-पोळी खाल्ली. मात्र, ही वेळ कोणावर येऊ नये. यासाठी अम्माने ‘अम्मा का टिफिन’ उपक्रम सुरू केला. अनेक गरजवंतांना या उपक्रमाअंतर्गत जेवणाचा टिफिन रोज पोहोचवला जातो.
Edited By : Atul Mehere
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.