Nagpur News: कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन वीज युनिटच्या विरोधात नागपुरातील पर्यावरणप्रेमी संघटनांनी शड्डू ठोकले आहेत. या वादात नंतर आता आमदार आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली. दरम्यान प्रस्तावित असलेले १३२० मेगावॅटचे प्रकल्प पारशिवणीऐवजी कोराडीत लावण्याची मागणी बच्चू कडू यांच्या प्रहार या संघटनेने केली.
यासंदर्भात कामठी तालुक्यातील महादुला येथील नगरसेवक मंगेश सुधाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मागणीचे पत्र दिले आहे. कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील जुने झालेले १०५ मेगावॅटचे चार संच ८ जानेवारी २०११ रोजी शासनाच्या राजकीय धोरणानुसार बंद करून महापारेषणअंतर्गत असलेली टॉवर लाइन वर्धा पॉवरचे विजेचे संच कार्यान्वित करण्यात आले.
खासगी क्षेत्राला टॉवर लाइन उपलब्ध करून देण्यात आल्याने चारही संच २०२० मध्ये चिमण्या पाडून जमीनदोस्त करण्यात आले. २०१७ मध्ये त्याठिकाणी पुन्हा ६६० मेगावॅटचे दोन संच प्रस्तावित करण्यात आले होते. पण अद्याप त्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. कोराडीतील प्रकल्प पारशिवणी तालुक्यात लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना कळवले होते, असे देशमुख यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
नागपूर (Nagpur) शहरानजीक कोराडी वीज केंद्र परिसरात २५०० एकर जागा महानिर्मीतीच्या ताब्यात असल्यामुळे असे १० संच जरी लावण्याचे ठरवले तर ते सहज शक्य आहे. या प्रकल्पाकरिता नागपूर महानगरपालिकेने (Municipal Corporation) भांडेवाडीतील मुबलक सांडपाणी उपलब्ध करून दिलेले आहे. याशिवाय राखेचे दोन तलाव तेथे उपलब्ध आहेत. कोराडीत अंदाजे २२३० वेतनगट एक ते चार मधील कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता निवासी गाळे उपलब्ध आहेत. त्यामुळे हा प्रकल्प कोराडीतच करण्यात यावा, असे मंगेश देशमुख यांनी म्हटले आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.