गजानन काळुसे
Congress Gets Upset : राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं ‘टीम-34’ नेमली आहे. प्रदेश पातळीवरून यासंदर्भात सूचना प्राप्त होताच काँग्रेसचे विरोधी पक्षनेत्यांसह माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तातडीनं बुलडाणा जिल्ह्यात दाखल झालेत.
वडेट्टीवार यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट देत गुरुवारी (ता. 30) शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व पीकविमा कंपन्यांबद्दल संताप व्यक्त केला. (Leader Of Opposition Vijay Wadettiwar Slammed Government At Buldhana For Not Giving Helping Hand to Farmers Affected Due to Unseasonal Rain & Hail Storm)
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असं असतानाही त्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार दरिद्रीच म्हणावं लागले, अशी तीव्र टीका वडेट्टीवार यांनी केली. नुकसान झालेल्या पिकांची वर्गवारी करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणं अपेक्षित आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव येथील द्राक्षबाग व कापसाच्या शेतांचीही त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला.
गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहे. कधी अतिदृष्टी तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट यामुळं शेतकरी खचलाय. अशात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज आहे. सरकार कर्ज माफ करण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही. त्यामुळं डिसेंबरमध्ये नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
व्यावसायिक क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जाते, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना सरकारच्या कपाळावर आठ्या पडतात. शेतकऱ्यांनी सरकारचं असं कोणतं नुकसान केले आहे, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला. पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत. या कंपन्यांकडूनदेखील शेतकऱ्यांना मोठी मदत सरकारनं मिळवून दिली पाहिजे. पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची कायम थट्टाच करतात. गेल्या वर्षीची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. कंपन्या केवळ निकष, अटी, नियम सांगत आपली जबाबदारी झटकतात. सरकार आणि पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नयेत, अन्यथा दगड हातात घ्यावा लागेल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
कापसाची वेचणी एकदाच झाली आहे. कापसाची पाच ते सहा वेळा वेचणी होत असते. परंतु अलीकडे झालेल्या पाऊस व गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडणार नाही. गेल्या वर्षी दुष्काळाशी शेतकरी झुंजत होता. आता अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करीत आहे. ही भयावह परिस्थिती सध्या राज्यात सगळीकडं आहे. त्यामुळं सरकारनं झोपेचं सोंग सोडावं, असंही ते म्हणाले. माजी आमदार सुरेश जेथलीया, राजाभाऊ जाधव, निळकंठ वायाळ, मनोज कायंदे, रमेश कायंदे, सिद्धार्थ जाधव, सरपंच निवृत्ती काठोरे, शिवदास रिंढे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी भागवत किंगर आदी या वेळी दौऱ्यात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.