Nagpur Assembly Session 2023 : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोप दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या नाशिकमध्ये 2017 मध्ये झालेल्या एका लग्न समारंभात तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह राजकीय पक्षाचे (भाजप) काही आमदार आणि पदाधिकारी हजर होते. तसेच दाऊदचा हस्तक सलिम कुत्ता याच्याशीही महाजन यांचे संबंध असल्याने या प्रकरणी एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत गंभीर आरोप केले.
गिरीश महाजनांवर कारवाई करावी, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही या प्रकरणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनीही मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करत घेरले.
गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच आक्रमकपणे सभागृहात प्रत्युत्तर दिले. ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन गेले, त्या लग्नात सर्वपक्षीय नेते होते. काही अधिकारीही होते. मुस्लीम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरू ज्यांना शहर-ए-खतिब म्हणतात त्यांच्या पुतण्याचं लग्न होतं. पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते. शहर-ए-खतिब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झालं. त्यांच्या वडिलांचे जे सासर आहे, त्या सासरातील एक नातेवाईक तिचे दाऊदच्या कुठल्यातरी भावाशी लग्न झालं आहे. असा त्यावेळी आरोप करण्यात आला. पण ज्यांच्याशी लग्न झालं. त्याही परिवाराचा कुठेही दाऊदशी संबंध नाही. आरोपही नाही. शहर-ए-खतिबवरही कुठलाही गुन्हा नाही. आणि लग्न झालं त्या कुटुंबावरही नाही, असे देवेद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यावेळी अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर आपण स्वतः गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती. 2017-18 मधील हे प्रकरण आहे. तत्कालीन डीसीपींच्या अंतर्गत चौकशी समिती नेमली होती. शहर-ए-खतिब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही, असे या चौकशी समितीच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे. उद्धव ठाकरे आले म्हणून कदाचित असे विषय काढण्यात आले. एका मंत्र्यावर आरोप करताना त्याची खातरजमा न करता. आणि त्याची चौकशी आधीच झालेली आहे, अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलिम कुत्तासोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही?, असा सवाल करत फडणवीसांनी विरोधकांना दणदणीत प्रत्युत्तर देत गप्प केलं.
एकतर कुठलाही संबंध नाही. पण मंत्र्यावर अशा प्रकारे बेछूट आरोप केल्याबद्दल खडसेंनी माफी मागावी. यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. सभागृहातून बाहेर आल्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर उत्तर दिले. सलीम कुत्ता प्रकरणात सुधाकर बडगुजर हे अडकत असल्याचे पाहून जुनं कुठलं तरी प्रकरण काढून विरोधकांनी दाऊदशी संबंध आल्याचा खोटा आरोप केला. हा शिवसेना ठाकरे गटाचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांची अवस्था एवढी वाईट झाली आहे की ते भांबावले आहेत. त्यातूनच ते असे बेछूट आरोप करत आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.