

अमरावती : महापालिकेच्या स्थायी समितीसाठी 16 सदस्यांसह 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी दिलेल्या यादीनुसार महापौरांनी या नावांची घोषणा शुक्रवारी (ता.२०) झालेल्या पहिल्या आमसभेत केली. स्वीकृत सदस्यांमध्ये माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचा समावेश आहे. स्थायी समितीत महायुतीचे 11 सदस्य असून त्यांचे या समितीवर वर्चस्व आहे.
तब्बल 4 वर्षांनी महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आले असून शुक्रवारी पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत महापालिकेतील सर्वांत महत्त्वाची व आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांचीही निवड आमसभेत करण्यात आली. नवीन सभागृहाच्या पहिल्या समितीचा कार्यकाळ 1 वर्षांचा असून पुढील वर्षी यातील 8 सदस्य निवृत्त होतील. त्यांच्या जागी नवीन 8 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
पहिल्या वर्षासाठी पक्षीय संख्याबळाच्या आधारावर सदस्य निवडण्यात आले असून भाजपला सर्वाधिक 5 सदस्य मिळाले आहेत. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला 3, वायएसपीला 3, राष्ट्रवादी व एमआयएमला प्रत्येकी 2 तर शिवसेना गटास 1 सदस्य, या समितीत पाठविता आला आहे. महायुतीकडे या समितीत 11 सदस्य असल्याने त्यांचे वर्चस्व राहणार आहे. आता सभापतिपद युतीतील कोणाकडे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सभेत आधी स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करण्यात आलीत. यामध्ये भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी 2, तर वायएसपी, राष्ट्रवादी, शिवसेना गट आणि एमआयएमच्या प्रत्येकी 1 सदस्याचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. माजी महापौर मिलिंद चिमोटे हे दुसऱ्यांदा स्वीकृत सदस्य या रूपाने सभागृहात आले आहेत. यापूर्वी ते गत पंचवार्षिकमध्ये भाजपकडून होते. यावेळी ते काँग्रेसचे स्वीकृत सदस्य आहेत.
वृत्तपत्र क्षेत्रातील अनिल अग्रवाल यांना काँग्रेसकडून स्थान मिळाले आहे. भाजपने विधी व क्रीडा क्षेत्रातील अॅड. प्रशांत देशपांडे आणि प्रा. संजय तीरथकर यांना राष्ट्रवादीने तंत्रशिक्षण क्षेत्रातील भोजराज काळे यांना, तर वायएसपीने संजय हिंगासपुरे, एमआयएमने सैय्यद मुजव्वर अली व शिवसेनेने माजी नगरसेवक दिनेश बूब यांना सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून स्वीकृत सदस्यपदी पाठविले आहे.
ठाकरे - शिंदे एकत्र :
अमरावती महापालिकेत स्थायी समिती व स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना-बसपा गटात, तर वंचित बहुजन आघाडी गट काँग्रेसमध्ये विलीन झाला होता. या विलीनिकरणानंतर शिवसेना-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-बसपा आघाडीला एक स्वीकृत सदस्य म्हणून घेता येणार होता. या गटाने दिनेश बूब यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत संधी दिली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बूब मैदानात उतरले होते. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेषतः राणा यांच्या पराभवात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे बोलले गेले. आता याच बूब यांच्यासाठी ठाकरे - शिंदे एकत्र आल्याची चर्चा आहे.
भाजप : मिलिंद बांबल, पद्मजा कौंडण्य, पंचफुला चव्हाण, स्मिता सूर्यवंशी, विनोद तानवैस
वायएसपी : प्रशांत वानखडे, प्रियंका पाटणे, दीपक साहू सम्राट
राष्ट्रवादी : अविनाश मार्डीकर, मीनल सवाई
शिवसेना गट : मंजुषा जाधव
काँग्रेस : प्रशांत महल्ले, आसमा फिरोज खान, ललिता रतावा
एमआयएम : सल्लाउद्दीन इकरामोद्दीन, नजीब खान करीम खान
भाजप : अॅड. प्रशांत देशपांडे, संजय तीरथकर
काँग्रेस : मिलिंद चिमोटे, अनिल अग्रवाल
राष्ट्रवादी : भोजराज काळे
शिवसेना गट : दिनेश बूब
वायएसपी : संजय हिंगासपुरे
एमआयएम : सैय्यद मुजव्वर अली
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.