
A Post is going Viral on social Media from Dhanorkar's Office : कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे ३० मे रोजीच्या पहाटे दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमध्ये अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाला चार दिवस होत नाही, तोच धानोरकरांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Various discussions have arisen in Chandrapur Lok Sabha constituency)
खासदार धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातले एक पत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
‘१३-चंद्रपूर लोकसभेच्या मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास आपल्याकडे पुनर्वापर करण्याजोगे साहित्य आहे किंवा कसे, याबाबत ताबडतोब आढावा घेण्यात यावा. तसेच ज्या साहित्याची आवश्यकता आहे, याबाबतची अंदाजित मागणी या कार्यालयाकडे करण्यात यावी, ही विनंती.’, असे पत्र अ. अ. खोचरे कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन विभाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
चंद्रपूर लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच धानोरकरांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी पोस्ट व्हायरल केली आहे. या पोस्टमधून त्यांनी सरळ सरळ विरोधकांना इशारा दिल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोण करणार, याबाबतही विविध चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
धानोरकरांच्या कार्यालयाकडून व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टमध्ये दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांचे फोटो आहेत आणि ‘तूच दुर्गा, तू रणरारागिणी, ढाण्या वाघाची, तू वाघिणी’, असा मजकूर आहे. ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टमधून विरोधक, त्यातल्या त्यात पक्षांतर्गत विरोधकांना धानोरकरांनी इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी (ता. २) बाळू धानोरकरांच्या अस्थींचे मारकंडा येथे वैनगंगा नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आजपासून (ता. ३) धानोरकरांचे चंद्रपुरातील (Chandrapur) जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. श्रद्धांजलीचे कार्यक्रम ११ जूनपर्यंत करण्याच्या सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) स्वतः लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.