Chandrapur News: खासगी शिक्षण संस्थांमध्ये विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या महिला आणि कंत्राटी तत्त्वावर असणाऱ्या महिलांची अवस्था अतिशय दयनीय आहे. या महिलांना प्रसूती रजा, योग्य वेतनमान, कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो. ही परिस्थिती व्यक्त करताना मला वेदना होत आहेत, असे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
महिला दिनी विधानसभेत बोलताना आमदार धानोरकर म्हणाल्या, या देशातील नव्हे या राज्यातील शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नियमित महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा, योग्य वेतन यासारख्या सुविधा देण्यात येत आहेत. परंतु दुसरीकडे शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनेत काम करणाऱ्या महिलांची अवस्था फार वाईट आहे. आजही अगदी मूलभूत सुविधा देण्यात आपण कमी पडतो आहोत.
महिलांना सुविधा देण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. केवळ एक दिवस महिला दिन साजरा करायचा, याला काही अर्थ नाही. आजही पुरुष मंडळी या विषयावर चर्चा करण्यात रस दाखवीत नाहीत. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या विधानसभेत जर एका सन्माननीय महिला आमदारासाठी आपल्या लेकराला स्तनपान करण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येत असेल तर या राज्यातील लाखोंच्या संख्येने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या आमच्या भगिनींची काय अवस्था असेल. याचा विचार महिला दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे, असे आमदार धानोरकर म्हणाल्या.
नटीच्या तोकड्या कपड्यांवर चर्चा होते, पण..
मागील तीन वर्षांपासून मी या सभागृहाची सदस्य आहे. परंतु माझ्यासकट या सभागृहातील कोणत्या सन्माननीय सदस्याने, संपूर्ण सभागृहाने या गंभीर मुद्द्य़ावर साधक-बाधक चर्चा करून एखादा ठोस निर्णय घेतल्याचे किंवा एखादे अतिशय परिणामकारक धोरण घोषित केल्याचे मला तरी आठवत नाही. एखाद्या नटीच्या तोकड्या कपड्यावर राज्यात चर्चा घडविली जाते. राजकीय पक्ष आंदोलन करतात, माध्यमे चर्चा करतात.
आमच्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या दुर्गम भागात आजही आमच्या माय माऊलींना परिस्थितीमुळे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे मिळत नाही. शेतकऱ्यांच्या (Farmers) महिलांना ठिगळ लावून अंग झाकावे लागते. यावर मात्र राजकीय पक्षांना बोलण्यासाठी सवड नाही. माध्यमांना चर्चा करायला वेळ नाही. एखाद्या राजकीय पक्षाने आंदोलन केलेलेसुद्धा बघायला मिळत नाही.
या राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या विशेष करून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि सन्मान मिळाला पाहिजे. या दिशेने या सभागृहाने काहीतरी ठोस निर्णय घेऊन राज्यातील आमच्या तमाम माता-भगिनींना महिला दिनाची भेट द्यावी, अशी अपेक्षा आमदार प्रतिभा धानोरकर (Prathbha Dhanorkar) यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.