भंडारा : पोलिसांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) ज्येष्ठ नेत्यांचा रोष पत्करून घेतलेले मोहाडी-तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे एकाकी पडल्याचे दिसत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना नव्हते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते आता आमदार कारेमोरेंना टाळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आमदार कारेमोरेंच्या त्या शिवीगाळ प्रकरणानंतर त्यांनी वरिष्ठांची माफीसुद्धा मागितली. तरीही नेते त्यांच्यावर नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये आमदार राजू कारेमोरे यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. पोलिसांना शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर चांगलेच नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या कृत्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतेही पाठबळ न मिळाल्याने मोहाडी पोलिस स्टेशन समोर नियोजित रास्ता रोको कार्यक्रम स्थगित करण्याची नामुश्की आमदारांवर आली आहे.
त्यामुळेच की काय वरिष्ठाकडून झालेल्या कानउघाडणीनंतर आमदार राजू कारमोरे यांनी माफी मागितल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रणच नसल्याने आमदारांना शिवीगाळ प्रकरण चांगलेच अंगलट आल्याचे दिसून येते. आमदार राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर आमदार कारेमोरे यांनी थेट मोहाडी पोलिस स्टेशन गाठत धिंगाणा घातला आणि पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर आमदारांवर सर्व स्तरावरून टीका सुरू झाली आहे. जिल्ह्यात ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रम सुरू असताना एका आमदाराकडून अशी बेजबाबदार वागणूक पक्षाच्या दृष्टीने हिताची नसल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.
राजू कारमोरे यांच्या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण आहेत. पोलिसांना शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधक त्याच्या वापर निवडणुकीत करतील. त्यामुळे कारेमोरेंना आता एकाकी पडावे लागे आहे. कालर्पयंत रास्ता रोको आंदोलनाची भाषा करणारे आमदार ऐन वेळी नरमले आणि काल दुपारी पत्रकार परिषद घेत चक्क जाहीर माफी मागितली. या प्रकरणानंतर आता आमदार कारमोरे एकटे पडले असून त्यांना भंडारा शहरात निर्वाण गल्लीत आयोजित जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनालाही बोलावण्यात आले नाही. जिल्ह्यातील इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील उमेदवार उपस्थित असताना राजू कारमोरे यांची अनुपस्थिती खूप काही बोलून जात आहे.
काय आहे प्रकरण ?
व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरेंनी मोहाडी पोलिस ठाण्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडला होता. आमदार एवढ्यावरच थांबले नाही तर पोलिसांनी 50 लक्ष रुपयाची रोख रक्कम पळविल्याची तक्रार आमदारांच्या मित्रांनी केली. कारेमोरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे दोन व्यापारी मित्र हे रात्री 9 च्या वाजताच्या दरम्यान घरून 50 लक्ष रुपयांची रोकड वाहनातून तुमसरकडे घेऊन जात होते. गाडी वळवताना इंडीकेटर का दाखवला नाही म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.
एवढेच नाहीतर 50 लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसांत दिली आहे. दबंगगिरी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी आता स्वतः गृह मंत्र्याकडे करणार असल्याचे सांगितले. मोहाड़ी पोलिसांनी देखील आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणत असल्याची तक्रार दाखल केली आहे. मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आता वरिष्ठाच्या नाराजीनंतर आमदारांना आपली चूक कळली असून त्यांनी त्या शिवीगाळीची माफी मागत निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या 18 जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवेळी विरोधक या मुद्यावर जोर देणार यात शंका नाही. आता आमदारांचे शिवीगाळ प्रकरण काय वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.