Nagpur Municipal Corporation : महानगरपालिकेची निवडणूक आज लागो, नाहीतर मे महिन्यात. भारतीय जनता पक्ष हा २४ तास काम करणारा पक्ष आहे. कुण्या एका नेत्याच्या भरवशावर किंवा नावाच्या भरवशावर काम न करता, कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून केलेल्या कामाच्या भरवशावर आणि आमचे नेते नितीन गडकरी, (Nitin Gadkari) देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विकास कामांच्या भरवशावर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढणार आहोत, असे भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके म्हणाले.
आगामी महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकीची तयारी काय, याबाबत आमदार दटके (Pravin Datke) पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आमचे सर्व बूथ केंद्रप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सर्व कार्यकर्ते आमचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी भरपूर कामे केली आहेत. पट्टेवाटप, पंतप्रधान आवास योजना, पाणी, वीज, रस्ते कुठलेही काम असो ते उत्तम दर्जाचे केले आहे. नागपूर (Nagpur) शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. इतक्या झपाट्याने बदललेले दुसरे शहर देशात नाही. याच केलेल्या कामाच्या भरवशावर आम्ही जनतेकडे जाऊ. आमचं प्रगतिपुस्तक त्यांना दाखवू त्यानंतर त्यांचे मत दानरुपाने आम्हाला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्ही हवेत जाणारे लोक नाही, अतिआत्मविश्वास तर अजिबात नाही. जमिनीवर घट्ट उभे राहून १२०प्लसचे टारगेट आम्ही महानगरपालिकेत नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करू. सत्तेत नसतानाही आम्ही विनम्र होतो, सत्ता आल्यावरही तेवढेच विनम्र राहिलो. विनम्रता हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा विशेष गुण आहे. गुजरात पॅटर्न येथे राबविला जाणार का, या प्रश्नावर गुजरात पॅटर्नवर बोलणे, माझ्या अधिकारात येत नाही. त्यामुळे मी बोलणार नाही. पण आमच्या प्रत्येक नगरसेवकाने पाच वर्षांत काय केले, याचा अहवाल आम्ही तयार केला आणि तो जनतेमध्ये वाटलासुद्धा आहे. याशिवाय घर चलो अभियान आम्ही राबविणार आहोत, असेही दटके म्हणाले.
आम्ही निरंतर कुठल्या ना कुठल्या कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत सातत्याने गेलो आहोत. नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आयोजित केलेले महोत्सव, त्यांनी केलेली विकास कामे, आमच्या नगरसेवकांनी त्यांच्या भागात केलेली कामे, ही आमची बलस्थाने आहेत. यापूर्वी तीन वेळा नागपूरकरांनी भाजपला सत्ता दिली आहे, ती एका विश्वासामुळे आणि चौथ्यांदाही जनता आमच्यावर विश्वास दाखवेल, याची खात्री आहे. उमेदवारी वाटपाचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डामध्ये होतो. तेथे आमचे शिर्षस्थ नेते याबाबतीत निर्णय घेतात आणि तो निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो, असेही आमदार दटके म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.