आमदार वडेट्टीवार संतापले; म्हणाले, आता वाटतं की 'ते' धरण फोडून टाकावं !

ज्या मेडीगट्टा धरणामुळे गडचिरोलीवर ही परिस्थिती उद्भवली, त्यासाठी तत्कालीन भाजप सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला. मागील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanfvis) गडचिरोलीत येऊन गेले. पण आजतायागत सरकारची मदत शेतकरी आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचली नाही. ज्या मेडीगट्टा धरणामुळे गडचिरोलीवर ही परिस्थिती उद्भवली, त्यासाठी तत्कालीन भाजप सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे कालपासून गडचिरोली (Gadchireoli) आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दोऱ्यावर आहेत. काल त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला, तर आज ते चंद्रपूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. काल पटोलेंसोबत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे देखील काही शेतांमध्ये प्रत्यक्ष बांधांवर पाहणी करण्यासाठी गेले. कॉंग्रेसने जिल्ह्याजिल्ह्यांत पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी समित्या नेमल्या होत्या. या दोन जिल्ह्यांसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आमदार वडेट्टीवार आहेत. पाहणी करून त्यांनी आपला अहवाल दिलेला आहे.

काल शुक्रवारी बांधावर ‘सरकारनामा’शी बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, ही परिस्थिती फारच भीषण आणि भयावह आहे. राज्य सरकारने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा जाहीर केलेली मदत तरी तात्काळ द्यावी. त्यांनी जाहीर केलेली तात्काळ ५ हजार रुपयांची मदतही लोकांना मिळालेली नाही. येथे लोकांचे खायचे आणि पिण्याच्या पाण्याचेही वांदे आहेत. जिकडे तिकडे पाणीच पाणी, पण प्यायला मिळत नाही पाणी, अशी अवस्था आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडचिरोलीत येऊन गेले. पण वैनगंगा नदीच्या पुलावर फोटोसेशन करण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. जेथे मोठे नुकसान झाले आहे, त्या शेतांवर, बांधांवर ते पोहोचलेच नाही. त्यांना या पुराचे गांभीर्यच माहिती नाही. त्यामुळे शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत.

तेव्हा आम्हीच आंदोलन केले होते..

मेडीगट्टा धरणाचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने होत आहे, हे आम्ही तेव्हा ओरडून ओरडून सांगितले होते. धरणावर जाऊन आम्ही आंदोलन केले होते, तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. २०१४ मध्ये भाजपचे सरकार असताना या धरणाचा घाट घालण्यात आला होता. `केसीआर’ तत्कालीन राज्यपाल आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे धरण बांधण्यात आले. शेवटी जी भिती होती, तेच झाले. मेडीगट्टा धरणामुळे आज गडचिरोली जिल्हा पाण्याखाली आला. प्रचंड नुकसान झाले. आता तर असं वाटतंय की हे धरणंच फोडून टाकावं. पण असं करणं योग्य नाही. आता या धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे, असे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar
Video: जात, पात, धर्म बघू नये; विजय वडेट्टीवार

...तर दोन-चार हजार लोक वाहून गेले असते !

जिल्हाधिकारी मिना यांनी पूर परिस्थितीमध्ये योग्य नियोजन केले म्हणून कुठलीही जीवित हानी झाली नाही. पुरात सापडलेल्या लोकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. नाहीतर दोन-चार हजार लोक वाहून गेले असते. जवळपास २२ गावांना या पुराचा फटका बसला आहे. आता सरकार अस्तित्वात नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. आता या धरणाचे ऑडिट करून योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नाही तर उद्या पुन्हा असा पूर आल्यास लोक वाहून जातील, अशी भिती आमदार वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com