Aditya Durugkar MNS : नागपूरपासून जवळच असलेल्या बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी (ता. 17) सकाळी झालेल्या भीषण स्फोटात नऊ कामागरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सोलर कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. यापूर्वी कंपनीत 2018 मध्ये स्फोट झाला होता. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला. 2023 मध्येही सहा महिन्यांपूर्वी स्फोटाची घटना घडली होती. परंतु हे प्रकरण दडपण्यात आलं, असा आरोप कंपनीवर आहे.
सहा महिन्यांपूर्वी सोलर कंपनीत झालेल्या स्फोटानंतर मनसेचे नागपूर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. कंपनीतील श्रमिकांच्या सुरक्षेबाबत त्यांनी कामगार आयुक्तांना निवेदनही दिले होते. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं आता नऊ निष्पाप श्रमिकांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप दुरूगकर यांनी केलाय.
कंपनीत रविवारी स्फोट झाल्यानंतर बाजारगावातील ग्रामस्थांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखली. येथे तैनात असलेल्या पोलिसांनाही संतप्त ग्रामस्थ जुमानत नव्हते. कंपनीतील कामगांरांना अत्यंत कमी वेतन देण्यात येते. त्यांना कामासाठी ‘टार्गेट’देण्यात येते. कामाचे ‘टार्गेट’ पूर्ण झाले नाही तर योग्य मोबदला देण्यात येत नाही, असा आरोप आहे. आदित्य दुरूगकर यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी कामगार आयुक्तांच्या निदर्शनास हे सर्व प्रकार आणले होते.
तक्रारी ऐकल्यानंतर कामगार आयुक्तांना सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील प्रकारांबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कोणतीही कृती कामगार विभागाने केली नाही, अशी टीका आदित्य दुरूगकर यांनी केली. प्रशासनानं वेळीच या सर्व प्रकारांची शहानिशा केली असतील तर नऊ श्रमिकांना कदाचित वाचविता आलं असतं असं दुरूगकर यांनी नमूद केलं. कंपनीच्या कामाची निष्पक्ष व नि:पक्ष चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही दुरूगकर यांनी केलीय.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नागपूर जिल्ह्यात असलेल्या सोलर कंपनीत औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित स्फोटकं तयार करण्यात येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या अत्यंत जवळ असलेले सत्यनारायण नुवाल हे या कंपनीचे संचालक आहेत. भारतासह तुर्की, झांबिया, नायजेरीया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, घाना, टांझानिया येथेही सोलर कंपनीचा ‘प्रेझेन्स’ आहे. जगातील 50 पेक्षा अधिक देशांमध्ये सोलर कंपनीच्या उत्पादनांचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक्स डेटोनेटर्स, थ्री लेअर शॉक ट्यूब, ब्लास्टेक 90, पी-3 आणि पी-5 स्फोटकं कंपनी तयार करते. मात्र बाजारगाव आणि आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांकडून सातत्याने कंपनीवर कामगारांच्या शोषणाचा आरोप होत आहे. रविवारीही घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्यानं कंपनीच्या कामाकडे साशंकतेने पाहिले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.