नागपूर : पूरग्रस्तांना मदत करा, पंचनामे करा, अशी विनाकारणची ओरड विरोधी पक्षाकडून केली जात आहे. त्यात काही दम नाही. कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा लगेच केला होता आणि तेव्हाच मदतकार्य सुरू करण्यात आले, असे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आज म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, पूरग्रस्त भागात ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांना ताबडतोब मदत केली गेली पाहिजे. ज्यांच्या शेतांमध्ये नुकसान झाले, त्याचे पंचनामे करून त्यांना तातडीने मदत दिली गेली पाहिजे. ज्यांच्या घरात पाणी गेलं होतं, त्यासाठी ताबडतोब ५ हजार रुपये देण्याचाही निर्णय झाला आणि त्यानंतर लगेच निधीदेखील वितरित करण्यात आला आहे. याउपरही ग्रामीण आणि शहरी भागात शासनाकडून सर्वतोपरी मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, सत्तांतर होईल, असे संजय राऊत म्हणताहेत त्यात तथ्य आहे. सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने होईल. महाविकास आघाडी सरकार लवकर जाईल, असे जेव्हा आम्ही सांगत होतो, तेव्हा हेच संजय राऊत म्हणायचे की, भाजपवाले ज्योतीशी आहेत काय, कुंडल्या घेऊन बसतात काय? मग आता राऊत ज्योतीशी झाले काय, असा प्रतिप्रश्न करीत मुनगंटीवार म्हणाले, शिवसेना आता दोन तृतीयांश संपलेली आहे आणि उर्वरित लोकांना सांभाळून ठेवण्यासाठी राऊत असे वक्तव्य करीत आहेत.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात केलेल्या मदतीच्या मागणीसंदर्भात मुनगंटीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सरकार सर्व मदत करीत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यानंतरही दिलेल्या सूचनांप्रमाणे कामे होत आहे की नाही, याचा पाठपुरावा त्यांच्याकडून केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.