नागपूर : ज्येष्ठ साहित्यिक सुभाषिनी कुकडे यांनी ‘मॉम यु आर ग्रेट’ या कलाकृतीची निर्मिती केली. परंतु, प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आणि पुस्तकाचे प्रकाशन होऊ शकले नाही. पण त्यांचा जीव त्या पुस्तकात अडकला होता. इहलोकाच्या वाटेवर असलेल्या सुभाषिनी यांची इच्छा डॉ. पिनाक दंदे, नाना पटोले आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी पूर्ण केली. प्रकाशनानंतर काही तासांत सुभाषिनी यांनी जगाचा निरोप घेतला.
साहित्यिक त्याच्या कलाकृतीबाबत किती संवेदनशील असतो आणि प्रत्येक कलाकृतीवर किती जिवापाड प्रेम करतो याची प्रचिती दंदे हॉस्पिटलमध्ये आली. ‘आयसीयू’त असताना त्यांनी पती मधुकर यांच्याकडे कथासंग्रह प्रकाशनाची इच्छा व्यक्त केली होती. अर्धांगिनीची इच्छा पूर्ण करीत मधुकर कुकडे यांनी ‘आयसीयू’मध्येच प्रकाशन सोहळा आयोजित केला. मधुकर यांच्या जिवाची घालमेल डॉ. पिनाक दंदे यांनी हेरली. ‘आयसीयू’ मध्येच कथासंग्रहाचे प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला. मधुकर कुकडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर पाहुण्यांना या सोहळ्याला पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यांनीसुद्धा परिस्थिती बघून मोठ्या मनाने होकार दर्शविला.
कथासंग्रहाचे प्रकाशन हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये नाही तर आयसीयूमध्ये होईल, असे डॉ. पिनाक दंदे यांनी मधुकर कुकडे यांना सांगितले. जोखीम होती, पण लेखिकेच्या इच्छेपुढे ही जोखीम काहीच नव्हती. त्याप्रमाणे सुभाषिणी कुकडे यांच्या आयसीयूतील बेडशेजारी पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मधुकर कुकडे, नाना पटोले, डॉ. पिनाक दंदे, आमदार विकास ठाकरे, बाबूराव तिडके, आमदार अॅड. अभिजित वंजारी, ज्येष्ठ संपादक गजानन जानभोर, विशाल मुत्तेमवार, याज्ञवल्क्य जिचकार आदींची उपस्थिती होती. ‘आयसीयू’मध्येच हा छोटेखानी पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी, काँग्रेसचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्तेसुद्धा या भावनिक क्षणामुळे भारावले होते.
कोरोना झाल्याने ‘मॉम यु आर ग्रेट’चा प्रकाशन सोहळा दोनवेळा पुढे ढकलावा लागला होता. गेल्यावर्षीच त्यांना आजाराने गाठले. फुप्फुसामध्ये संसर्ग झाल्याने त्यांच्यावर गेल्या सव्वा महिन्यापासून शहरातील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आजाराच्या काळात सुभाषिनी यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत पती मधुकर कुकडे यांच्याकडे बऱ्याचदा बोलल्या होत्या. आठ दिवसांपूर्वी प्रकृती अचानक खालावल्याने मधुकर कुकडेसुद्धा कासावीस झाले. प्रकृती गंभीर असताना रुग्णालयात प्रकाशन कसे करावे, असा मोठा प्रश्न उभा ठाकला होता. सुभाषिनी कुकडे यांची ही इच्छा पूर्ण होताच मध्यरात्री अडीच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विशेष म्हणजे, त्यांचे आणखीन एक पुस्तक छपाईच्या प्रक्रियेमध्ये असून त्याचेसुद्धा लवकरच प्रकाशन करण्याचा मानस मधुकर कुकडे यांनी व्यक्त केला आहे. सुभाषिनी कुकडे यांचे आजवर सहा पुस्तक प्रकाशित झाले आहेत. काही अविस्मरणीय प्रसंगांचे आपण साक्षीदार ठरणे हा केवळ योगायोग नसतो, तर कुठलेही कार्य करताना आपण ज्या प्रामाणिक भावना जोपासतो, त्याची ती फलश्रुती असते. हाच अनुभव दंदे हॉस्पिटलमध्ये आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.