Appointment of MLAs appointed by the Governor : सर्वोच्च न्यायालयाच्या ११ जुलैच्या निकालानुसार राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला विरोध करणारी याचिका मागे घेण्यात आली. त्यामुळे आता शिंदे - फडणवीस - पवार सरकारला विधानपरिषदेवर १२ आमदारांची नियुक्ती करता येणार आहे. नियुक्त करायच्या आमदारांची यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाकडे सादर केली आहे. (The Chief Minister has submitted the list of MLAs to the Governor)
अकरा दिवसांपूर्वीच सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटातून जिल्ह्यातील हेविवेट नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांचेदेखील नाव असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले फुंडे यांना आता विधानपरिषदेच्या आमदारपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
भंडारा - गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दबदबा आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत त्यांनी बंड करत, शिंदे - फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाला गवसणी घातली. अर्थातच यात प्रफुल्ल पटेल यांचे मोठे पाठबळ होते हे सर्वश्रुत आहे. बंड आणि मंत्र्यांच्या शपथविधीनंतर लगेचच तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीला विरोध करणारी याचिका मागे घेण्यास परवानगी दिली आहे.
भाजप सहा, शिवसेना (शिंदे गट) तीन, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील तीन जागा देण्यात येणार आहेत. विधानपरिषदेवर नियुक्त होणाऱ्या १२ आमदारांची यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. पटेल यांचे जिल्ह्यातील निकटवर्तीय असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांचं नाव देखील राष्ट्रवादीच्या तीन आमदारांमध्ये असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
सुनील फुंडे मागील १६ वर्षांपासून ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. तर त्यापूर्वी १० वर्ष त्यांनी जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्षपद सांभाळले आहे. विशेष म्हणजे जनसंघाचे खंदे समर्थक असलेले स्व. मुरलीधर नंदनवार यांच्यासोबत त्यांच्या वडिलांचे कौटुंबिक हितसंबंध असल्याने ते मुरलीधर नंदनवार यांच्या तालमीत वाढले आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून साकोलीची विधानसभा निवडणूक लढविली होती. पहिल्यांदाच लढलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. भंडारा जिल्ह्यातील सहकार नेते, सहकार महर्षी म्हणून त्यांना ओळखले जाते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही प्रफुल्ल पटेल यांनी सुनील फुंडे यांचे नाव राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या सदस्य पदासाठी राज्यपालांकडे पाठवले होते. मात्र इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे त्यांना तेव्हा वगळण्यात आले होते. आता राज्यातील प्रस्थापित शिंदे, फडणवीस व पवार सरकारमध्ये त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये पाठविण्यात आले असून, राज्यपालांनी या नावांवर शिक्कामोर्तब केले असल्याची चर्चा आहे.
पटोलेंना शह देणार?
जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सुनील फुंडे यांनी मविआला (Mahavikas Aghadi) तिलांजली देत थेट भाजपसोबत (BJP) हात मिळवणी केली होती. त्यात ते यशस्वी झाले. फुंडे हे जिल्ह्यातील सहकार नेते आहेत आणि साकोली विधानसभा मतदारसंघात त्यांचे चांगले प्रस्थ आहे. आमदार झाल्यास याच विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोलेंना (Nana Patole) ते शह देणार का, हा प्रश्न चर्चिला जात आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.