NCP has started party building in Nagpur : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहे. त्यातच लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकत्र होणार असल्याच्या चर्चांनीही जोर पकडला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारण्याची तयारी केली आहे. (Party meetings, new appointments are also being made)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या बैठकांपासून, नव्या नियुक्त्याही केल्या जात आहेत. शरद पवार यांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीने आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने 'वन बूथ टेन युथ'च्या फॅार्म्युल्यानुसार नागपूरमध्ये पक्षबांधणी सुरू केली आहे.
विदर्भाकडे कायम दुर्लक्ष करीत आलेला पक्ष, अशी राष्ट्रवादीबद्दल लोकांची धारणा झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा फक्त एकच नगरसेवक होता. आगामी निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढवण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. त्यासाठी 'वन बूथ टेन युथ'च्या फॅार्म्युल्यानुसार काम सुरू केले आहे.
भाजपने फार पूर्वीपासून वन + ३१ च्या धोरणानुसार काम सुरू केले आहे. भाजप हा निवडणूक आल्यावर तयारी करणारा राजकीय पक्ष नाही. तर २४ बाय सात, राऊंड द क्लॉक काम करणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीने आत्ता काम सुरू केले. पण त्यांची ही तयारी खूप आधीपासून सुरू आहे. त्यामुळे बलाढ्य भाजपला राष्ट्रवादी येथे लढत देऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे सांगितले जाते. पण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीपासूनच ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. असे झाल्यास कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट स्वतंत्र लढतील. त्या परिस्थितीत नागपुरात कॉंग्रेसच जास्त ताकदवर असेल. (राष्ट्रवादी आणि ठाकरे गटापेक्षा) मग राष्ट्रवादीचा 'वन बूथ टेन युथ' फॉर्म्यूला भाजपच्या 'वन + ३१'शी कशी लढत देणार, हा प्रश्न आहे.
असं म्हणतात की, राजकारण आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काहीही सांगता येत नाही. बाजी कशीही पलटू शकते. २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती दयनीय झाली होती. मोठमोठे नेते पक्षाला रामराम ठोकून निघून चालले होते. तेव्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर शिलेदारांना त्यांच्या - त्यांच्या मोहिमेवर पाठवून शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता.
विरोधी पक्षांकडून हिणवले जात असतानाही पवारांनी (Sharad Pawar) एकाकी झुंज दिली आणि तब्बल ५४ आमदार निवडून आणले. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग करून सत्ताही हस्तगत केली. तो चमत्कार पुन्हा होण्याची आशा येथील नेते, कार्यकर्त्यांना आहे. पण फक्त आशा ठेऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल. नेते-कार्यकर्त्यांना आपसातील मतभेद मिटवावे लागतील. तेव्हाच कुठे भाजपच्या 'वन + ३१' ला तोडीस तोड उत्तर देता येणे शक्य आहे.
काय आहे वन + ३१?
भाजपने (BJP) प्रत्येक बूथवर ३१ जणांची कार्यकारिणी गठित केली आहे. त्यामध्ये महिला, युवक सर्वांनाच प्रतिनिधित्व दिले आहे. सर्व समावेशक अशी ही कार्यकारिणी असून सर्व समाज सर्व घटकांचा या समावेश असणारे धोरण फार पूर्वी तयार केले आहे. त्यानुसार कामही सुरू झाले आहे. पेजप्रमुख हे या कार्यकारिणीचे वैशिष्ट्य़ आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.