Bhandara Nagar Panchayat Election : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायत बंडखोरीने पुन्हा चर्चेत आली आहे. काल झालेल्या मोहाडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना पहायला मिळाला. दरम्यान पुतण्याने काकूला चीत करून विजयश्री खेचून आणली.
काल पार पडलेल्या नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) पध्याक्षपदाच्या निवडणुकीत (Election) विचित्र योग घडून आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच (NCP) दोन उमेदवार आमने-सामने उभे ठाकले. यात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार मनीषा गायधने या पराभूत झाल्या, तर राष्ट्रवादीचेच बंडखोर सचिन गायधने निवडून आले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे भंडाऱ्यातील एकमेव आमदार राजू कारेमोरे यांची मोहाडी ही होम पिच असल्याने त्यांनाही नगरसेवक जुमानत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेत आपल्याच पक्षाचे नगरपंचायत उपाध्यक्ष शैलेश गभने यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव १२ विरुद्ध ०५ मताने पारित केला आणी गभनेंना पायउतार केले. काल पुन्हा मोहाडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. १७ सदस्यीय मोहाडी नगरपंचायतीत भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे सहा आणि काँग्रेसचे दोन सदस्य, असे पक्षीय बलाबल आहे. मात्र भाजपमध्ये दोन गट पडले असून एका गटात पाच तर दुसऱ्या गटात चार सदस्य आहेत. काल झालेल्या निवडणुकीत भाजपच्या एका गटाच्या समर्थनाने राष्ट्रवादी काँग्रेसने मनीषा गायधने यांना अधिकृत उमेदवार घोषित केले होते. परंतु या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येसुद्धा दोन गट पडले व राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने सचिन गायधने यांचा अर्ज दाखल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोन उमेदवार उभे ठाकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी १० विरुद्ध ७ मतांच्या फरकाने सचिन गायधने यांना विजयी घोषित करण्यात आले. राष्ट्रवादीचे सचिन गायधने यांना राष्ट्रवादीच्या रेखा हेडाऊ, वंदना पराते, सुमन मेहर यांनी साथ दिली तर भाजपच्या एका गटाचे ज्योतिष नंदनवार, छाया डेकाटे, सविता साठवणे, दिशा निमकर तसेच काँग्रेसचे महेश निमजे व देवश्री शहारे यांनी पाठिंबा दर्शविल्याने त्यांना १० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या मनीषा गायधने यांना राष्ट्रवादीचे पवन चव्हाण व भाजपच्या दुसऱ्या गटाचे शैलेश गभने, हेमचंद पराते, यादवराव कुंभारे, पूनम धकाते, अश्विनी डेकाटे यांनी पाठिंबा दिल्याने ७ मते प्राप्त झाली.
या सर्व घडामोडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट पडले. एका गटात ४तर दुसऱ्या गटात २ सदस्य विभागले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी व्हीप जारी केला होता. परंतु बंडखोर ४ सदस्यांनी तो व्हीप झुगारला. उपाध्यक्ष निवडणुकीवरून राष्ट्रवादीची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे भंडाऱ्यातील एकमेव आमदार राजू कारेमोरे यांची मोहाडी ही होम पिच असल्याने त्यांनाही नगरसेवक जुमानत नसल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान मोहाडी नगर पंचायतीच्या राजकारणात सुरुवातीपासूनच पक्ष, नीती, नियम, पक्षादेश याला तिलांजली दिलेली पहायला मिळत आहे. बंडखोर आपले वर्चस्व कायम करताना दिसत आहेत. त्यामुळे पक्ष प्रमुखांना आता खरच विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पक्षादेश झुगारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान या बंडखोरीच्या राजकारणाची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.