Nitin Gadkari : पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी सांगितला फंडा !

Vidarbha : वर्धा येथे होत असलेल्या सिंदी ड्राय पोर्टचे महत्व अधोरेखित केले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : विदर्भाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे. याच हेतूने विदर्भातील औद्योगिक क्षमता विकसित करणे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्टार्टअप्स आणि उद्यमशीलतेला चालना देणे, विक्रेता विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे, रोजगारासाठी नवकल्पना आणि पोषक वातावरण निर्माण करणे आणि यशस्वी उद्योजकाच्या यशोगाथा प्रदर्शित करण्यासाठी नागपूरमध्ये येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

ताडोबा-अंधारी अभयारण्यामुळे तेथे व्यवसाय वाढले, रोजगार वाढला. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रीज वाढल्या त्यामुळे तेथे बाहेरचे लोक आले आणि इतर स्थानिक व्यवसायांनादेखील (किराणा दुकाने, हॉटेल्स, कपड्यांची दुकाने आदी...) चालना मिळाली. आता विदर्भातही आपण नेमकं हेच करणार आहोत. येथे महिंद्रा, मदर डेअरी सारखे उद्योग येत आहेत. नवनवीन इंडस्ट्रीज येतील तर विदर्भातील स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल. या इंडस्ट्रीज मध्ये आलेल्या नवीन लोकांमुळे व्यवसाय वाढतील. हेच उद्योग मग तुम्हालाही जाहिराती देतील (पत्रकारांना उद्देशून) असे नितीन गडकरी म्हणाले आणि एकच हशा पिकला.

Nitin Gadkari
भर सभेत नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर | Nitin Gadkari On Government Officer

मी उरलो फक्त फोटोपुरता..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बेधडक विधाने आणि खुमासदार शैलीत बोलण्यासाठी ओळखले जातात. आजही त्यांनी असंच काहीसं बोलत सुमारे तासभर पत्रकार आणि इतर उपस्थितांना हसवीत ठेवलं. ते म्हणाले, आता माझं फार काही काम उरलं नाही. ही टीम सर्व काही करून घेते. पण अशा आयोजनांसाठी पैसा लागतो. त्यासाठी प्रायोजक लागतात आणि ही मंडळी माझा फोटो लावून फिरतात तर त्यांना प्रायोजक मिळतात. त्यामुळे मी आता फक्त फोटोपुरता उरलो आहे, बाकी मला काही काम नाही, असे म्हणताच पुन्हा हशा.

तेथे भोजन व्यवस्था उत्तम दर्जाची असते..

विदर्भ अडव्हांटेजमध्ये तुम्ही सर्व पत्रकार या, भरपूर बातम्या करा. तेथे मिडिया कक्ष तयार केला हे. तुमच्या चहा, नाश्‍ता आदींची सर्व व्यवस्था आहे. आणि हो... लक्षात घ्या जेथे मी असतो, तेथे भोजन व्यवस्था उत्तम दर्जाची असते. कारण मी स्वतः खवय्या आहे, असे म्हणत त्यांनी पत्रकारांना विदर्भ ॲडव्हांटेजमध्ये येण्यासाठी प्रेरित केले.

नागपुरातील पहिलेच आयोजन..

असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव 27 जानेवारी ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे होणार आहे. खासदार औद्योगिक महोत्सवाच्या अंतर्गत नागपुरात प्रथमच हे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील सर्वात मोठा इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह या माध्यमातून बघायला मिळणार आहे.

कापूस थेट बांग्लादेशात जाणार..

याप्रसंगी नितीन गडकरी यांनी विदर्भातील कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता वर्धा येथे होत असलेल्या सिंदी ड्राय पोर्टचे महत्व अधोरेखित केले. कापसाच्या गाठीची थेट बांग्लादेशला हल्दीया बंदराच्या माध्यमातून वाहतूक झाल्यास विदर्भातील कापूस उत्पादकांचा वाहतूक खर्च वाचेल आणि त्यांना प्रतिक्विटंल आर्थिक लाभ होईल. कुही येथे अडीच हजार एकर जमीन ही एमआयडीसीची असून या जमिनीवर जर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी उपलब्ध केले, तर येथे पेट्रोल रिफायनरीचीही क्षमता निर्माण होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भद्रावतीच्या जंगलात आहेत मिथेनचे साठे..

पेट्रोल डिझेल ला पर्याय ठरू पाहणाऱ्या मिथेनचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या जंगलात आहे. त्याचासुद्धा उपयोग औद्योगिक वाढीसाठी होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. बुटीबोरीत मदर डेअरीचा साडेचारशे कोटीचा प्रकल्प होणार असून नागपुरात असणारे विविध उद्योग समूह चांगली कामगिरी करत आहेत, असे त्यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था, व्हिएनआयटी, आयआयएम तसेच इतर शैक्षणिक संस्थांचादेखील या औद्योगिक महोत्सवात सहभाग राहणार आहे. इंडस्ट्री -अकॅडमी कनेक्ट यांच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उद्योगाबद्दल माहिती मिळणार आहे. तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवात विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांतील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com