Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे परफॉर्मर नेते नितीन गडकरी यांचे नाव भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये नाही. यावरून गडकरींनी आजवर ब्र शब्ददेखील काढला नाही, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये या विषयावरून तू तू - मैं मैं होत आहे. या मुद्द्यावरून राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला हाणला आहे.
आज (ता. 8) नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, बावनकुळे आपल्या सोयीप्रमाणे बोलतात. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी कुठून लढावं, हा आमच्या हायकमांडचा निर्णय असतो. बावनकुळे यांचा निर्णय नसतो. कोण कोणाला पाडू शकतो, कोणाला उमेदवारी द्यावी, हा निर्णयसुद्धा हायकमांड घेतात. प्रदेशाध्यक्ष तो निर्णय घेत नाहीत किंवा विरोधी पक्षनेतेसुद्धा घेत नाहीत. आम्ही आमचा सर्व्हे पक्षाकडे पाठवतो. अंतिम निर्णय हायकमांड घेतील.
नागपुरात नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी आमच्याकडे जिंकणारे उमेदवार आहेत. बावनकुळे यांना त्याची काळजी करण्याची गरज नाही. त्यांची वर्धेला जाण्याची तयारी सुरू आहे. त्यांनी तिकडे जावे आणि तिकडेच लक्ष द्यावं, असा सल्लाही वडेट्टीवारांनी बावनकुळेंना दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपने महाराष्ट्रात अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याची तयारी चालवली आहे. त्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असल्याची माहिती आहे. तेथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजप लढवणार असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे बावनकुळेंनी आता नागपुरात लक्ष घालू नये, असे वडेट्टीवार म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठे नेते आहेत. असे असले तरी पहिल्या यादीत त्यांना तिकीट मिळत नसेल, तर यावर आश्चर्य व्यक्त होणारच. भाजप श्रेष्ठींकडून गडकरींना नेहमी अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले असतील की, आमच्याकडे यावं, आम्ही गडकरींना तिकीट देऊ आणि निवडूनही आणू. राजकारणात आणि तेसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर असे वक्तव्य केले जातात. याचा अर्थ गडकरी येतीलच आणि आम्ही उमेदवारी देऊच असं घडेलच, असं काहीही नसतं.
पोटनिवडणुका होतात, तेव्हा भाजप हरते. आता मात्र आता 400 पार म्हणत आहेत. यात साऊथचा दरवाजा भाजपसाठी बंद आहे. पश्चिम बंगालमध्ये तीच स्थिती आहे. महाराष्ट्रातही अवस्था वाईट आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत आम्ही लढत असल्याने भाजपच्या जागा निश्चितपणे कमी होतील. हरियाणा साफ होत असताना त्यांना पुढे वाढायला जागा नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी ईव्हीएमबाबत वक्तव्य केले असावे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.