
नागपूर : रवी राणा यांनी आपल्यावर लावलेल्या खोक्याच्या आरोपाचे पुरावे द्यावे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्षपणे आरोप करीत आहेत. त्यामुळे त्यांनीच आता याचे उत्तर द्यावे अशी मागणी माजी मंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कड़ू यांनी केली आहे.
अमरावती (Amravti) जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राणा दांपत्यांनी कडू तोडी करणारा आमदार आहे, खोके घेतल्यानंतरच ते गुवाहाटीला गेले होते, असा आरोप केला होता. याविरोधात कडू यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या संदर्भात त्यांनी आज नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले राणा दाम्पत्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यांचा बोलविता धनी मात्र वेगळाच दिसतो. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनीच आता कोणी पैसे घेतले हे जाहीर करावे. याचे उत्तर एक नोव्हेंबरपर्यंत मिळाले नाही तर आपण आपल्या पद्धतीने आंदोलन करू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
गुवाहाटिला गेलेल्या आमदारांना पैसे घेतले असा आरोप रवी राणांचा आहे. मग त्यांना पैसे दिले कुणी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी दिले असतील तर त्यांनी तसे सांगावे. जर त्यांनी दिले नसतील तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी दिले असतील, तर त्यांनी तसे सांगावे. पण असा आरोप म्हणजे आमच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. कुठे कार्यक्रमात गेलो, लग्नात गेलो, तर लोक मागून ५० खोकेवाला आमदार आला, असे म्हणत टिंगल उडवतात. त्यामुळे आता एकट्या बच्चू कडूचा विषय नाही, तर गुवाहाटीला गेलेल्या ५० आमदारांचा विषय झालेले आहे, असे बच्चू कडू म्हणाले. याशिवाय त्यांतील ८ ते १० आमदार माझ्या संपर्कात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कड़ू आणि राणा अमरावती जिल्ह्यातील सक्रिय नेते आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. मात्र शिवसेनेच्या बंडात ते सहभागी झाले होते. दुसरीकडे रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक होते. आता ते भाजपच्या जवळ गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसाचे पठणामुळे राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आले होते. दोघेही युती सरकारचे समर्थक आहेत. असे असले तरी राणा यांनी तर कडूंनी खोके घेतल्याचा थेट आरोप केल्याने त्यांच्यात चांगलेच बिनसले आहे.
आमदार कडू म्हणाले, आपण २० वर्षांपासून आमदार आहो. मात्र असे आरोप यापूर्वी कधी आपणावर झाले नाही. आता विवाह समारंभामध्येही खोक्याचे टोमणे मारले जात आहे. सत्तेत सहभागी असलेलेच असे आरोप करीत असल्याने जास्त त्रास होत आहे. राणा यांनी याचे पुरावे द्यावे. त्यांच्या आरोपांमुळे ५० आमदार नाराज आहेत. नोटीस बजावून याचे उत्तर त्यांना मागितले जाईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही याची माहिती देण्यात आली आहे. राणा स्वतः आपण फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे असल्याचा दावा करतात. हे बघता त्यांना आरोप लावण्यासाठी कुठली तरी बाह्य शक्ती ताकद देत असावी, अशी शंकाही यावेळी बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.