चंद्रपूर : राज्यात सत्तांतरण होऊन तीन ते चार महिन्यांचा काळ लोटला. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आले. नव्या सरकारने नवीन टिम घोषित केली. त्यात चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याचे पालकतत्त्व सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना दिले. मात्र, जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर अजूनही पालकमंत्री म्हणून माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आहेत.
संकेतस्थळावर त्यांचा फोटो, त्यांच्याकडे असलेले खाते याचा उल्लेख आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. मित्ताली सेठी यांचीही बदली होऊन काही महिने झाले. मात्र, या संकेतस्थळावर त्याच जिल्हा परिषदेच्या (ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे नमूद आहे. सरकार बदलले, अधिकारीही बदलले. मात्र, संकेतस्थळावर जुनेच पालकमंत्री, सीईओ आहेत. जवळपास दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची मुंबईत बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. मित्ताली सेठी आल्या.
आयटी क्षेत्रावर भर असलेल्या डॉ. सेठी यांनी जिल्हा परिषदेतील अनेक विभागांच्या कामात पारदर्शकता यावी, फाइलींचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी अनेक कामे ऑनलाइन केली. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचे जुने असलेले संकेतस्थळ अपग्रेड करण्यात आले. अपग्रेड करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर जिल्ह्याची संपूर्ण माहिती, जिल्हा परिषदेतील विविध विभाग, त्यांच्या योजना, निविदा, पदभरती, मुलाखती, स्थायी समिती, वित्त समिती, पाणीपुरवठा समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती, महिला व बालकल्याण समित्या, समाजकल्याण समिती, पंचायत समित्या, तेथील विभाग प्रमुख, त्यांचे संपर्क क्रमांक दिले आहे.
या संकेतस्थळावर पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, समित्यांचे सभापती यांचा उल्लेख आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. एकनाथ शिंदे यांनी जवळपास चाळीस आमदार सोबत घेऊन आघाडीतून फारकत घेतली. त्याचा परिणाम महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. राज्यात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारने काही महिन्यांत जिल्ह्याचे पालकमंत्री घोषित केले. त्यात चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्याकडे पालकमंत्री पदासोबत वन, सांस्कृतिक आणि मत्स्य हे खातेही देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजय वडेट्टीवार पालकमंत्री होते. त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन खातेही होते. मात्र, सत्तांतरण झाल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पालकमंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांचेच नाव आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची बदली होऊन काही महिने झाले. त्यांच्या जागेवर आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विवेक जॅान्सन आले आहेत. असे असतानाही या संकेतस्थळावर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. मित्ताली सेठीच आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.