Chandrapur जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी जोरदार कमबॅक करावे, अन्यथा होणार दमछाक...

Grampanchayat : मतदारांनी जाहीर केलेल्या निकालपत्रकात काही लोकप्रतिनिधी आपापल्या क्षेत्रात पास झाले.
Chandrapur
ChandrapurSarkarnama

Grampanchayat Election Results Analysis : लोकप्रतिनिधींकडून कितीही विकासाच्या बाता केल्या जात असल्या, तरी ग्रामीण मतदार निवडणुकीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधींचे प्रगतिपत्रक जाहीर करीत असतो. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी दिलेला कौल हा विद्यमान लोकप्रतिनिधींची धाकधूक वाढविणारा असाच आहे. मतदारांनी जाहीर केलेल्या निकालपत्रकात काही लोकप्रतिनिधी आपापल्या क्षेत्रात पास झाले. तर, काही नापास ठरले आहेत.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत सदस्यांसोबतच सरपंचही (Sarpanch) थेट जनतेतून निवडण्यात आले. निवडणूक (Election) राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नसली, तरी प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत असतात. गावपातळीवरील कार्यकर्त्यांना समोर करून आपल्या पक्षाच्या विचाराच्या माणसांना रिंगणात उतरवितात. त्यानंतर सुजान मतदार लोकप्रतिनिधींच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या पॅनेलच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घालत असतात. या निवडणुकीतील मतदारांचा मूड हा विद्यमान लोकप्रतिनिधींना पुढील निवडणुकीची मोर्चेबांधणी करणे सोयीचे ठरत असते.

कॉंग्रसेच आमदार सुभाष धोटे यांच्या राजुरा मतदारसंघात सतरा ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. कोरपना तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायतींवर शेतकरी संघटना-भाजप युतीचा, तर कवठाळा या ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचा सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. राजुरा तालुक्यातील चारपैकी तीन ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस, एका ग्रामपंचायतीवर भाजप समर्थित उमेदवार विजयी झाला. जिवती तालुक्यात भाजप-गोंडवाना गणतंत्र पक्षाला दोन, शेतकरी संघटनेचा एका ठिकाणी सरपंच विजयी झाला.

राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील मूल तालुक्यात सातपैकी चार ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस, तर तीन ठिकाणी भाजपचा सरपंच विजयी झाला. बल्लारपूर तालुक्यात भाजप आणि कॉंग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी दोन सरपंच आले. पोंभुर्णा तालुक्यात कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही प्रत्येकी एक सरपंच मिळाला आहे. एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. चंद्रपूर विधानसभेतील पाच ग्रामपंचायतीमध्ये भाजप, कॉंग्रेस, गोंडवाना गणतंत्र पक्ष आणि शिवसेना (ठाकरे) यांना प्रत्येकी एका ग्रामपंचायतीमध्ये सरपंच मिळाले. एका ठिकाणी महाविकास आघाडीचा सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला. माजी पालकमंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरीत मतदारसंघात सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. सिंदेवाही तालुक्यात भाजप दोन, कॉंग्रेस समर्थित उमेदवार एका ठिकाणी विजयी झाला. ब्रह्मपुरीत तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात आली.

Chandrapur
Dhanorkar : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीवरील स्थगिती कायम..

सावली तालुक्यातील दोन ग्रामपंचायती भाजप आणि एका ठिकाणी कॉंग्रेसचा सरपंच विजयी झाला. चिमूर विधानसभा मतदारसंघात नागभीड तालुक्यात पाचपैकी चार कॉंग्रेस, तर एका ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विजयी झाले. चिमूर तालुक्यातसुद्धा प्रत्येकी दोन ग्रामपंचायत कॉंग्रेस आणि भाजपचा सरपंच निवडून आला, तर एका ग्रामपंचायतीवर अपक्षाने बाजी मारली. कॉंग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वरोरा-भद्रावती मतदार संघात आठ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलने विजय प्राप्त केला आहे. एकंदरित, जिल्ह्याच्या १५ तालुक्यांतील ५९ गावांतील मतदारांनी दिलेला कल हा जिल्ह्यातील सर्वच विद्यमान लोकप्रतिनिधींना येत्या काळात विकासकामांच्या माध्यमातून जोरदार कमबॅक करावे. अन्यथा अडीच वर्षांनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगली दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशाराच दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com