Ladki Bahin Yojna and Amravati Congress : महायुती सरकारच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत चाललेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या अर्जावर मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतःचा फोटा लावल्याने अमरावती जिल्ह्यात राजकारण तापले आहे. काँग्रेसने या अर्जावर आक्षेप घेतला असून आमदारांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार देवेंद्र भुयार(Devendra Bhuyar) यांनी तहसीलदार, पंचायत समिती गट विकास अधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनाची माहिती देण्यासाठी बैठक घेतली. सोबतच स्वतःचा फोटो असलेल्या अर्जाच्या प्रती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांना वाटप करण्याची सूचना दिली होती.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपये महिना दिला जाणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी महिलांची एकच गर्दी झाली आहे. आमदारांमार्फत वितरित केले जात असलेले अर्ज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हाती पडताच त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत फॉर्म संबंधित वेबसाईटवर आहे. आमदारामार्फत वितरित केले जात असलेले अर्ज बनावट आहेत. महिलांची फसवणूक करणारे आहे. त्यांच्या विरोधात फवसणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदानाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
सोबतच आमदाराचे कार्यकर्ते या फॉर्मची विक्री करीत असल्याचा आरोपही काँग्रेसचा आहे. या सर्व प्रकारणाची चौकशी करावी, आमदारांना साथ देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर तसेच महिलांची फसवणूक टाळण्यासाठी त्वरित कायदेशीर कार्यवाही अशी मागणीही केली जात आहे.
या फसवेगिरीचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी वरुड तालुक्यातील तहसीलदार यांच्या कार्यालयात धडक दिली. तहसीलदारांनी फॉर्म छापणारे आमदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचे सांगितले. या उत्तराने चिडलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले.
त्यानंतर तहसीलदारांनी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत फसवणुकीची चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा, असे पत्र पंचायत समितीला पाठवले. त्याची एक प्रत आंदोलकांना देण्यात आली. सोबतच आमदारांचे छायाचित्र असलेल्या अर्जाचे वितरण थांबवण्याचेही आदेश दिले आहे.
काँग्रेसचा(Congress) या योजनेला सुरुवातीपासूनच विरोध आहे. महिलांना लाभ मिळू नये, असे प्रयत्न काँग्रेसच्या काही घरंदाज नेत्यांकडून केले जात आहे. त्यांना पैशाची गरज नसली तरी आमच्या आई-बहिणींना आहे. ही योजना माझी नाही तर सरकारची आहे. गरजू महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत.
काही दलाल अर्जासाठी व विविध दाखल्यासाठी पैसे मागत असल्याच्या तक्रारी होती. काही महिलांकडूनी ५०० रुपये अर्जासाठी घेतल्याची माहिती आपल्याला आहे. त्यामुळे आपण वेबसाईटवर असलेल्या फॉर्मच्या प्रती मोफत उपलब्ध करून दिला. ऑफलाईन अर्ज भरून घेतल्या जात आहे. त्यात काही चुका आढळल्यास ऑनलाईनपूर्वी अर्ज भरण्यापूर्वी त्या सुधारल्या जाऊ शकतात हा त्या मागचा उद्देश आहे. ऑनलाईन अर्जसुद्धा मोफत भरून देण्याची व्यवस्था आपण केली असल्याचे आमदार भुयार यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.