Bhandara News: राजकीय नेते लावत होते शासनाला चुना, तहसीलदारांच्या चौकशीत सापडले !

Government Scheme : १५०० बोगस लाभार्थ्यावरकारवाई करत त्यांचे अनुदान बंद केले आहे.
Bhandara
BhandaraSarkarnama

Bhandara District News : राजकीय नेते (Political Leaders) आपल्या कार्यकर्त्यांना तसेच मतदारांना खूश करण्यासाठी शासनाच्या निकषात बसत नसतानासुद्धा योजनांचा लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळवून देत आहेत. नेते शासनाला चुना लावत असल्याच्या धक्कादायक प्रकार भंडारा (Bhandara) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडीच्या तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत हे घबाड समोर आले आहे.

मोहाडीतील अशा विविध योजनांचा (Government Scheme) लाभ घेणाऱ्या १५०० बोगस लाभार्थ्यावर मोहाडी तहसीलदारांनी (Tahsildar) कारवाई करत त्यांचे अनुदान बंद केले आहे. मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांनी शासनाद्वारे (Government) मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यावर कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत १५०० बोगस लाभार्थ्यांचे अनुदान बंद केले आहे. दर महिन्याला एक हजार रुपये मिळावे, यासाठी प्रत्येकच जण आपले नाव यादीत यावे, यासाठी धडपड करीत करतो. राजकीय हस्तक्षेपाने मोहाडी तालुक्यात लाभार्थ्यांची संख्या ३० हजारांच्या जवळ पोहोचली आहे.

झपाट्याने वाढलेला हा आकडा पाहून तहसीलदारांनी चौकशी केली असता लाभ घेणारे १५०० लाभार्थी बोगस असल्याचे निष्पन्न झाले. या लाभार्थ्यांना अपात्र करत मिळणारे अनुदान बंद केले आहे. अजून काही लाभार्थी अपात्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शासनाकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा व अपंग साहाय्य योजना या योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून दर महिन्याला १००० रुपये अनुदान दिले जाते. पात्र लाभार्थी निवडण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक अशासकीय समिती असते.

या समितीचे अध्यक्ष व सदस्य हे सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते राहात असल्याने ते आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव डोळे झाकून मंजूर करतात. मागील कार्यकाळात अपात्र असणारे असे हजारो प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. श्रावणबाळ योजनेत ६५ वर्षावरील ज्येष्ठ व्यक्तींना लाभ दिला जातो, परंतु याच योजनेत सर्वाधिक २० हजाराच्या वर लाभार्थी आहेत. या योजनेचा लाभ उचलणारे हजारो लाभार्थी हे ६५ वर्षाखालील आहेत. हे लक्षात आल्यावर तहसीलदारांनी प्रत्येक लाभार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले संबंधित शाळांतून मागविले. त्याची पडताळणी केली असता १५०० लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरत नाही.

Bhandara
Bhandara : आता पेटतोय महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद, भंडारा जिल्ह्यातील लोक होताहेत आक्रमक...

श्रावणबाळ योजनेसाठी ६५ वर्षाची अट असतानाही येथे ५० वर्षाखालील हजारो लाभार्थी असल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी मोहाडीच्या तहसीलदारांनी प्रत्येक लाभार्थ्याचे शाळा सोडल्याचे दाखले संबंधित शाळांतून मागविले असून त्याची पडताळणी सुरू आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी काहींची मुले तर अवघे १२ ते १८ वर्षांचे आहेत. त्या लाभार्थ्यांचे वय ६५पेक्षा जास्त कसे काय असू शकते, असा सवाल केला जात आहे. मोहाडी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे ८२४१ आणि श्रावणबाळ योजनेचे २१४९५ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दर महिन्याला शासनाकडून २ कोटी ७९ लाख ३८ हजार १०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येते.

दर महिन्याला लाभार्थ्यांची संख्या वाढत असल्याने अनुदानातही वाढ होत असते. दरम्यान मोहाडी तहसीलदार यांनी केलेल्या चौकशीत हे घबाड उघड झाले आहे. विशेष म्हणजे तहसीलदार दीपक कारंडे यांनी आता या लाभार्थ्यांची चौकशी सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. एकट्या मोहाडी तालुक्यात बोगस लाभार्थ्यांचा आकडा वाढलेला आहे. जर हिच चौकशी भंडारा जिल्ह्यातील इतर तालुक्यांत केली तर नक्कीच असे अनेक बोगस लाभार्थी सापडतील आणि शासनाचे कोट्यवधी रुपये वाचू शकतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com