Mock drill : अल्लाह हो अकबरच्या घोषणा; पोलिसांच्या मते, फक्त मुस्लीमच अतिरेकी !

Chandrapur Police : धार्मिक द्वेषांना खतपाणी घालण्याचे काम प्रशासकीय यंत्रणासुद्धा कळत-नकळत करीत असतात.
Chandrapur Police Mok Drill
Chandrapur Police Mok DrillSarkarnama

Chandrapur District News : माणुसकीच्या आड येणारी धर्माची भिंत आणि राजकारणासाठी (Politics) जाणीवपूर्वक पसरवला जाणारा धार्मिक द्वेष समाजासमोरील मोठे आव्हान आहे. अशा धार्मिक द्वेषांना खतपाणी घालण्याचे काम प्रशासकीय यंत्रणासुद्धा कळत-नकळत करीत असतात. असाच धक्कादायक प्रकार चंद्रपूर पोलिसांनी केला.

देवस्थानात अतिरेकी हल्ल्याचे मॉकड्रील करताना चक्क मुस्लिम समाजाला आंतकवादी म्हणून दाखविण्यात आले. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. तर आंतकवादी झालेल्या पोलिसांनी (Police) ‘अल्लाह हो अकबर’ अशा घोषणासुद्धा दिल्या. या प्रकारावर मुस्लीम समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली. याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. चंद्रपूर (Chandrapur) पोलिसांनी ११ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध महाकाली देवस्थानावर अतिरेकी हल्ल्याचे मॉक ड्रील केले.

यात मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी आणि पोलिस शिपाई सहभागी झाले होते. आंतकवाद्यांचा हल्ला मोडून काढण्यासाठी जी यंत्रणा पोलिसांना हवी, त्या सर्वांचा वापर या मॉक ड्रीलमध्ये करण्यात आला. महाकाली मंदिर परिसरात लपलेल्या अतिरेक्यांना अटक करण्यात आली. गोळीबार झाला. बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले. पोलिसांच्या कारवाईनंतर अटकेतील अतिरेक्यांनी अल्लाह हो अकबर अशा घोषणा दिल्या. घोषणा देणारे पोलिसच होते. मॉकड्रीलसाठी त्यांनी अतिरेक्यांची वेशभूषा केली होती. हा धक्कादायक प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोरच घडला.

हा सर्व नाट्यमय प्रकार पोलिसांच्या मॉकड्रीलचा हा एक भाग होता. मात्र, आता मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मॉकड्रीलच्या माध्यमातून विशिष्ट समाजाचेच नागरिक अतिरेकी असतात, असा समज रूढ केला जात आहे. जाणीवपूर्वक समाजात हे पसरविले जात आहे. हा धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न आहे. याला जबाबदार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली.

Chandrapur Police Mok Drill
BJP : भाजपचे मिशन लोकसभा; चंद्रपूर हिट तर संभाजीनगर फ्लॉप, काय आहेत कारणे?

या शिष्टमंडळात ॲड. फरहान बेग, ॲड. जावेद शेख, ॲड. कल्याण कुमार, ॲड. रफीक शेख, ॲड. दाऊद शेख यांचा समावेश होता. अद्याप पोलिस यंत्रणेने संबंधितांवर कारवाई केली नाही. ही चूक अवधानाने झाली, अशी सावरासावर त्यांच्याकडून केली जात आहे. मागील काही वर्षांपासून समाज माध्यमांवर विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्याचा प्रकार वाढला आहे. त्याचे पडसाद समाजात अनेकदा हिंसक घटनांच्या स्वरूपात उमटले आहे. मात्र, पोलिसांसारखी कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणाच या धार्मिक द्वेषाच्या बाबतीत गंभीर नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

मॉकड्रील पोलिसांची अंतर्गत बाब आहे. एका विशिष्ट धर्माच्या लोकांना अतिरेकी दाखविणे ही अनवधानाने झालेली चूक आहे. संबंधितांना ताकीद दिली आहे. भविष्यात अशा चुका होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

रवींद्र परदेशी, जिल्हा पोलिस अधीक्षक, चंद्रपूर.

फक्त एकाच धर्माचे नारे का लागले. पोलिस यंत्रणेचा हा प्रकार धक्कादायक आहे. अनवधानाने झाले असेल, पण यातून मानसिकता दिसून आली. हा प्रकार समाजात तेढ निर्माण करणारा आहे.

ॲड. फरहान बेग, सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com