Ravikant Tupkar to Government : महाएल्गार मोर्चा ही लढाई केवळ शेतकऱ्यांच्या मागण्यांची लढाई नाही. गावगाड्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचा तो लढा आहे. राजवाडा विरुद्ध गावगाडा अशी ही लढाई आहे. आम्ही सरकारला आठ दिवसांची मुदत देतो. २७ नोहेंबरपर्यंत मागण्या पूर्ण केल्या नाही, तर २८ नोहेंबरला राज्यभरातील शेतकऱ्यांसह मुंबई गाठत मंत्रालयात घुसून मंत्रालयाचा ताबा घेऊ, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.
बुलडाणा येथे शेतकरी, शेतमजुरांचं वादळ सोमवारी (ता. २०) तुपकर यांच्या नेतृत्वात धडकले. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा हा एल्गार महामोर्चा चांगलाच विक्रमी ठरला. सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. (Ravikant Tupkar From Buldhana Gave Ultimatum of 8 Days To Government To Accept Demands Of Farmers)
जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल परिसरातून महामोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक, मुख्य बाजार लाईन, कारंजा चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. राज्यभरातील पदाधिकारी तसेच कर्नाटकातून आलेले शेतकरी कार्यकर्तेही व्यासपीठावर उपस्थित होते. तुपकर या वेळी म्हणाले, गेल्या वर्षीही मोर्चा काढला होता. मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन, आत्मदहन आंदोलन केले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पीकविमा व मदत असे तब्बल ५१७ कोटी रुपये मिळाले. अन्नत्याग आंदोलन व दिल्लीतील पाठपुरावा यामुळे सोयाबीनला आठ, तर कापसाला दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
सध्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सोयाबीनला किमान ९ हजार रुपये व कापसाला १२ हजार स्थिर भाव मिळणे गरजेचे आहे. राज्य सरकारनं आठ दिवसांत यासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा परिणामांसाठी तयार राहावं. २९ नोव्हेंबरला आम्ही शेतकऱ्यांसोबत धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेऊ, असा इशारा तुपकरांनी दिला. महामोर्चा काढण्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी एल्गार रथयात्रा देखील काढली. या रथयात्रेला व्यापक प्रतिसाद मिळाला. यात्रेचा समारोप महामोर्चाच्या माध्यमातून झाला. परंतु हा समारोप नाही तर लढ्याची सुरुवात आहे, असं तुपकर म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
येलो मोझॅक, बोंड अळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ९ हजार व कापसाला किमान १२ हजार ५०० रुपयांचा भाव गरजेचा आहे. चालू वर्षाची पीकविम्याची अग्रिम व १०० टक्के पीकविमा भरपाई मिळावी, अशीही आंदोलकांची मागणी आहे. शासनानं कोणतीही अट न ठेवता संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, असंही तुपकरांचं म्हणणं आहे. वन्यजीवांचा मोठा उपद्रव शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यासाठी शेतीला सौरऊर्जेचे नव्हे तर तारांचे किंवा सिमेंटचे मजबूत कंपाउंड मिळावे, असंही त्यांचं म्हणणं आहे.
Edited by : Prasannaa Jakate
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.