Buldhana District Farmers News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपल्या आक्रमक आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा सरकारच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ताकद काय असते, हे सरकारला दाखवून देणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. (He attempted self-immolation by pouring petrol on his body while dressed as a policeman)
सरकारच्या छाताडावर बसून मागण्या पूर्ण करून घेऊ, असेही तुपकर म्हणाले. आजारपणातून सावरल्यानंतर रविकांत तुपकर पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. ‘स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर’च्या कार्यालयातून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे.
यापूर्वी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर बुलडाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर तुपकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेतले होते.
या आंदोलनानंतर रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. आक्रमक आंदोलनाच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले रविकांत तुपकर पुन्हा सक्रिय झाले असून, राज्यव्यापी आंदोलन उभारणार आहेत. नुकतीच त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आक्रमक आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी तसेच पिकांच्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसानभरपाई मिळावी, या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलनाचा शंख फुंकण्यात आला आहे.
या निमित्ताने शेतकरी, शेतमजूर व तरुणांचा रणसंग्राम पाहावयास मिळणार आहे. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन होणार असून, एक नोव्हेंबर रोजी शेगाव येथून एल्गार रथयात्रेला सुरुवात होणार आहे. बुलडाण्यात २० नोव्हेंबर रोजी एल्गार महामोर्चा निघणार आहे.
अशा आहेत मागण्या..
राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी सर्वाधिक आहेत, परंतु तरीही सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने लढा देत आहोत, यावर्षीदेखील राज्यव्यापी आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे.
यलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसानभरपाई मिळावी, सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान नऊ हजार व कापसाला किमान १२,५०० रुपये भाव मिळावा.
चालू वर्षाची पीकविम्याची अग्रिम व १०० टक्के पीकविमा भरपाई मिळावी, विनाअट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात महापुराने झालेल्या नुकसानीची १०० टक्के नुकसानभरपाई मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी आता आरपारची लढाई लढणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.