Ravikant Tupkar : तुपकर गरजले, म्हणाले ‘त्या’ राजकीय गढ्या उद्ध्वस्त करू...

Farmers : बळीराजा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

Buldhana District News : शेतकऱ्यांच्या हितासाठीचा आपला लढा पूर्वीपासून सुरू आहे आणि यापुढेही सुरुच राहणार आहे. आंदोलन केले म्हणून तुरुंगात टाकले, तरीही हे आंदोलन थांबणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुरुंगातच काय तर फासावर जाण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना दिली. (This movement will not stop)

शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्यांना बळीराजा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या राजकीय गढ्या उद्ध्वस्त करू, असा इशाराही तुपकर यांनी दिला. सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांविरोधात बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींवर ते विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या सरींसारखे बरसले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचा खरपूस समाचार तुपकरांनी घेतला. तुम्ही सत्तेत असतानाही आंदोलन करता ते चांगले आणि शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला तर नौटंकी होते का, असा सवाल उपस्थित करत सत्ताधारी आमदारांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलले पाहिजे. सोयाबीन-कापसाची दरवाढ, पीकविमा, नुकसान भरपाई यासाठी सभागृहात आवाज उठविला पाहिजे.

हे न करता ते शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टिका करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात विष कालवणे आहे. ११ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांवर अमानवीय पद्धतीने लाठीचार्ज केला. हा लाठीमार करायला लावणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांच्या राजकीय वतनदाऱ्या उद्ध्वस्त करण्यासाठी आता बळीराजा सज्ज झाला आहे. आमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. शेतकऱ्यांसाठी तुरुंगात काय फासावर पण जायला आम्ही तयार आहे, असे तुपकर म्हणाले.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar News: तुपकरांचा पुन्हा गंभीर इशारा; म्हणाले, आठ दिवसांत उर्वरित विमा न मिळाल्यास...

पीकविमा, नुकसान भरपाई आणि शेतमालाला दरवाढ मिळावी, यासाठी आपला लढा सुरुच राहील, अशी ग्वाही तुपकर यांनी दिली. आंदोलनातून जिल्ह्यातील २ लाख १ हजार ६११ शेतकऱ्यांच्या पदरात १५८ कोटी रुपये पीकविमा पाडू शकलो, याचे समाधान आहे. तसेच जलसमाधी आंदोलनामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १७४ कोटी रुपये मंजूर झाले आहे, परंतु ते देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ती रक्कम देण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा आहे, असेही यावेळी तुपकरांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी कितीही डावपेच आखले तरी आता शेतकरी त्यांची चाल ओळखून आहे. शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचा हिसका दाखवा आणि सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन यावेळी तुपकरांनी (Ravikant Tupkar) केले.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : अर्थसंकल्प म्हणजे बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा !

यावेळी 'स्वाभिमानी'चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, बबनराव चेके, विनायक सरनाईक, भारत वाघमारे, सहदेव लाड, राम अंभोरे, मधुकर शिंगणे, शेख जुल्फेकार, वसंतराव पाटील, गणेश शिंगणे, अंकुश सुसर, अनिल बोरकर, गणेश गारोळे, देवा आखाडे, दीपक बन्सोडे, विवेक ठाकरे तसेच माजी सभापती गजानन बंगाळे, सरपंच ज्योती सावळे, पोलीस पाटील लक्ष्मण जायभाये, सभापती गजानन बंगाळे आदी उपस्थित होते.

ही नव्या राजकीय पर्वाची सुरुवात..

दरेगाव येथील हा मेळावा म्हणजे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील नव्या राजकीय पर्वाची सुरुवात आहे. शेतकऱ्यांसाठी (Farmers) जिवाची पर्वा न करता लढत राहणाऱ्या नेत्याला जिल्हाभरातून शेतकरी, कष्टकऱ्यांचे मिळणारे समर्थन पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे इंगोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com