Sandeep Deshpande : ‘आत’मध्ये संजय राऊत साहेबांचा वेळ जात नाहीये, म्हणून...

म्हणून दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकार परिषद घ्यायला भाग पाडण्यात आले, अशी आमची स्पष्ट माहिती आहे, असे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले.
Raju Umbarkar, Sandeep Deshpande and Avinash jadhav.
Raju Umbarkar, Sandeep Deshpande and Avinash jadhav.Sarkarnama

नागपूर : सामना हे वृत्तपत्र नाहीच, हे माझं स्पष्ट मत आहे. केवळ स्वतःचंच कौतुक छापायचं, याला काही वृत्तपत्र नाही म्हणत. वृत्तपत्रांत बातम्या असतात, त्यांना स्वतःचंच कौतुक करायचं आहे, तर त्यांनी पुस्तक छापावं, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आज सकाळी नागपुरात (Nagpur) दाखल झाल्यानंतर त्यांनी रवी भवन येथे पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेला मनसेचे नेते अविनाश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, (Raju Umbarkar) शहराध्यक्ष विशाल बडगे, ग्रामीणचे अध्यक्ष आदित्य दुरूगकर, घनश्‍याम निखाडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र दिल्यानंतर अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार भाजपने (BJP) मागे घेतला. यानंतर राज ठाकरे यांचे आभार मानण्याचे काम पडू नये, म्हणून दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकार परिषद घ्यायला भाग पाडण्यात आले, अशी आमची स्पष्ट माहिती आहे, असे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले. राज ठाकरेंनी पत्र लिहिलं त्यानंतर भाजपने उमेदवारी मागे घेतली, हे सर्व स्क्रिप्टेड होतं, असा आरोप केला जात आहे, याबद्दल विचारले असता, ‘आत’मध्ये संजय राऊत साहेबांचा वेळ जात नाहीये. म्हणून तेथे बसल्या बसल्या ते स्क्रिप्टींग करीत असतात. म्हणून ते आमच्यावर ‘स्क्रिप्टींग’चा आरोप करत आहेत. आणि आतमध्ये ते पुस्तकसुद्धा लिहीत असल्याचे माहिती आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या महिन्यात राज ठाकरेंना विदर्भाचा दौरा केला होता. मनसेची कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर काही नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत, तर काही राहिलेल्या आहेत. त्यासाठी आज मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि राजू उंबरकर नागपुरात आले आहेत. या नियुक्त्या करण्यासाठी आज पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहोत. यामध्ये उर्वरित कार्यकारिणी ठरवणार आहोत. नागपूर शहरातील जनतेचे विषय आणि त्यासाठी काम करण्याची दिशा, यासंदर्भातही आज आमची चर्चा होणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

पाण्याचा प्रश्‍न हाती घेणार..

आजच शहराध्यक्षांनी सांगितले की, नागपुरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. एक तर पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. मीटरची बिलं जी येतात, त्यामध्ये प्रचंड तफावत आहे. २४ बाय ७ पाणी देऊ, असे येथील सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते. पण गेल्या पाच वर्षांत त्या दृष्टीने जे काम व्हायला हवे होते, ते झाले नाहीत. त्यामुळे नागपूरकर अद्यापही तहानलेलेच आहेत. त्यामुळे आता हा प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातात घेणार आहे. त्यासाठीच्या आंदोलनाची दिशासुद्धा आजच्या बैठकीत ठरवली जाईल. त्यानंतरही पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही, तर येथील पाण्यासंबंधीचे महापालिकेतील जे कुणी अधिकारी आहे, त्यांना मनसे रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या आयुक्तांची राहील, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.

Raju Umbarkar, Sandeep Deshpande and Avinash jadhav.
भाजप-मनसे युतीच्या चर्चा: संदीप देशपांडे म्हणाले, स्पष्टच सांगतो...

शहर कार्यालयाच्या उद्घाटनाला येतील राज ठाकरे..

दिवाळी झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा कोकण दौरा आहे आणि त्यानंतर ते विदर्भात येणार आहेत. त्यांच्या हस्ते येथे मनसेच्या नागपूर शहर कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. रवि भवनच्या परिसरात स्वागत, शुभेच्छांचे बॅनर लावू नये, अशा सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com