Bhandara and Gondia News : भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदीतील घोटाळ्यात नवनवीन किस्से आता समोर येऊ लागले आहेत. ‘त्या’ राजकीय नेत्यांचे चेहरे उघड होऊ नये, यासाठी पणन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची बोंब आता दोन्ही जिल्ह्यांत सुरू झाली आहे.
पणन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी ४० लाखांचा निधी गोळा केल्याची चर्चा आता भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत दबक्या आवाजात होऊ लागली आहे. दरम्यान या प्रकरणाची रेकॉर्डिंग बाहेर आल्यास सर्व बिंग फुटणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शासकीय धान खरेदी केंद्र ही राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांना आणि त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आल्याची बाब आता लपून राहिलेली नाही.
धान खरेदी केंद्रांच्या संस्थांच्या यादीची पडताळणी केल्यास ते स्पष्ट होईल. सन २०१९च्या खरीप हंगामात धान खरेदीत प्रचंड घोळ झाला असून, यातील काही संस्था या भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील तीन राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांच्याशी निगडित संस्थांवर कारवाई होऊ नये, यासाठी दोन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी नेत्यांनी ४० लाखांचा निधी गोळा केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. दरम्यान निलंबनाच्या कार्रवाईनंतर हे सर्व अधिकारी एकत्र आले असून त्यांचा राजकीय बळी गेल्याची ओरड सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी त्या राजकीय नेत्यांच्या (Political Leaders) विरोधात मोर्चेबांधणीला लागले आहे.
या प्रकरणाची रेकॉर्डिंग बाहेर आल्यास सर्व बिंग फुटणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भंडारा आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यात आतापर्यंत तीन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान तीन वर्षांपूर्वी झालेल्या घोटाळयांची चौकशी सुरू झाली आहे. मात्र धान खरेदीत घोटाळे झाले आहेत, हे माहीत सर्वांना माहिती आहे.
यावर तीन वर्षे पांघरूण टाकणाऱ्या मार्केटिंग फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याने सुरू असलेली चौकशी पारदर्शक होणे कठीण दिसत आहे. आता हेच वरिष्ठ अधिकारी कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची, याबाबत दोन राजकीय नेत्यांना (Political Leaders) सल्ला देत असल्याची माहिती आहे.
शासन आणि प्रशासनाकडूनसुद्धा या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मेहरबानी दाखविली जात आहे. धान खरेदी घोटाळ्यास जेवढे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी जबाबदार आहेत, तेवढेच या प्रकरणावर पांघरूण घालणारे वरिष्ठ अधिकारीसुद्धा जबाबदार आहेत. शासन व प्रशासनाने याप्रकरणी पारदर्शकता ठेवत या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यास पुन्हा असे धान खरेदी घोटाळे होणार नाहीत, असा सूरदेखील आता दोन्ही जिल्ह्यांत उमटू लागला आहे.
या सर्व घडामोडींमध्ये धान खरेदी घोटाळाप्रकरणी नुकतीच भंडारा (Bhandara) येथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, यासाठी काही जणांनी ४० लाख रुपयांची वर्गणी गोळा करून ती संबंधितांपर्यंत पोहोचविल्याची सध्या दोन्ही जिल्ह्यांत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे वर्गणी गोळा करणारे ते कोण? यातील नेमके सत्य काय, ते या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास पुढे येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.