नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार कोसळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर नाही, हे सरकार पडणार नाही, असे पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभेतील संख्याबळाचे गणितच मांडले आहे. (Shinde-Fadnavis government will not fall : Ajit Pawar)
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अंबदास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मात्र हे सरकार लवकरच पडणार आहे, असे दाव्याने सांगितले. त्यामुळे नागपुरात सभेसाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींमध्ये अजूनही एकवाक्यता नसल्याचे दिसून येते.
अजित पवार म्हणाले की, कारण नसताना वावड्या उठविण्याचे काम चालले आहे. माझा स्वतःचा जो अभ्यास आहे, मला जे थोडे बहुत ज्ञान आहे. त्या आधारावर सांगतो की, सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र ठरविले तरी सध्याच्या सरकारकडे असणाऱ्या आमदारांची संख्या १४९ राहते. जर विधानसभेतील १६ आमदार कमी झाल्यानंतर २८८ मधून १६ आमदार कमी केले तर २७२ एवढी विधानसभेतील आमदारांची संख्या गृहीत धरली जाते. विधानसभेत २७२ ला बहुमत १३६ राहते, त्यामुळे आपणच ठरावा काय ते. ही वस्तुस्थिती आहे ना. माझं स्वतःचं मत असं आहे की, वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र अजित पवारांचे म्हणणे खोडून काढले आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सोळा आमदारांना अपात्र ठरविले, तर राज्यातील सरकार पडणार, असे माझे ठाम मत आहे. याबाबतचे गणित तुमच्या समोर कशाला मांडायचे. पण, हे १६ अपात्र ठरले, तर सरकार पडणार, हे निश्चित आहे.
राज्यातील सरकार पडू शकणार नाही, हे अजित पवार यांनी कशाच्या आधारावर सांगितले आहे, हे मला माहिती नाही. त्यांनी तसं सांगितलं की नाही, हेही मला माहिती नाही. मला वाटतंय की अजित पवार यांचा अंदाज चुकणार आहे आणि लवकर राज्यातील हे शिंदे-फडणवीस सरकार पडणार आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.