Buldhana Political News : आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांना पुरावे व प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. अध्यक्षांच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. राऊतांच्या या टीकेचा बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार समाचार घेतला. (Now the Assembly Speaker is performing his duty)
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते कायद्याच्या चौकटीत. ही निवड बेकायदा असती तर राज्यपालांनी त्यांना संधी दिली नसती. राज्यपालांना राज्यघटनेची जाण असते. निवडणूक आयोगानेही पक्ष आणि चिन्हाबाबत आपला निर्णय दिला आहे. आता विधानसभा अध्यक्ष आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात खासदार संजय राऊत यांनी टीका करणे म्हणजे शुद्ध बालिशपणा असल्याचा प्रतिहल्ला आमदार गायकवाड यांनी केला.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणजे अक्कलशून्य व्यक्ती असल्याचा घणाघात करीत आमदार गायकवाड म्हणाले की, त्यांना सर्व निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे हवे आहेत. आपल्या मनाप्रमाणे झाले की ते कायद्याच्या चौकटीत व मनाविरुद्ध झाले की बेकायदा, असे कुठे असते का, असा प्रश्नही आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी व्यक्त केला.
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) व आता विधानसभा अध्यक्षांकडे (R सुरू असलेली सुनावणी कायद्याच्या प्रक्रियेनुसार सुरू आहे. कोणत्याही गोष्टीचा न्यायनिवाडा करायचा असेल तर सर्वांना समान संधी द्यावी लागते. प्रत्येकाचे म्हणणे ऐकावे लागते. परंतु संजय राऊतांना घिसाडघाई आहे. यावरून राऊत किती अपरिपक्व आहेत, हे दिसून येते, अशी टीका आमदार गायकवाड यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी कायद्याचे अवलोकन केले आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी निवड अगदी योग्य आहे. आपला संविधानावर, कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. न्यायाच्या या लढाईत एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले सर्व आमदार विजयी होतील, असा विश्वासही आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला. जनता महाविकास आघाडीच्या सरकारला त्रासली होती. आताचे सरकार जनतेचे सरकार आहे.
आगामी निवडणुकीमध्येही जनता, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी नक्कीच उभी राहील, असे आमदार गायकवाड ठामपणे म्हणाले. नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने व इतरांना अपमानास्पद वागणूक दिल्याने रातोरात पूर्ण पक्ष हातून गेला. त्यामुळे ते सध्या हताश आहेत. काय करावे, हे त्यांना सुचत नाही. त्यामुळे केवळ आरोप करण्यात ही मंडळी धन्यता मानत आहे. राज्यातील सरकार या आरोपांकडे दुर्लक्ष करून जनहितासाठी झटत असल्याचेही आमदार गायकवाड यांनी नमूद केले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.