अमरावती : केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या (Delhi) सीमांवर मोठे आंदोलन पेटले होते. देशभरातून शेतकऱ्यांचे (Farmers) लोंढेच्या लोंढे तिकडे दररोज रवाना होताना दिसत होते. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रही (Maharashtra) यामध्ये मागे नव्हता. सिंघू बॉर्डरवर झालेल्या शेतकरी आंदोलनात नक्षलवाद्यांनी सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती प्राप्त होते आहे. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या दस्तावेजात याचा उल्लेख आहे.
नक्षलवाद्यांनी प्रकाशित केलेल्या २२ पानी पुस्तिकेत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या पुस्तिकेत नक्षल्यांनी (Naxal) ग्रामीण आणि शहरी भागात प्रभाव वाढवण्याची रणनीती आखली असल्याचे स्पष्ट होत आहे. माओवाद्यांनी २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना, समर्थकांना केले आहे. नक्षलवाद्यांनी काही राज्यांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू केल्याचे या दस्तऐवजातून समोर आले आहे. तसेच नक्षल्यांनी देशांतील काही आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला असल्याचे म्हटले आहे. यामध्ये कृषी कायद्याविरोधात झालेले शेतकरी आंदोलनाचाही समावेश आहे. या कृषी कायदाविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला.
नक्षलवाद्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले असल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे. त्याशिवाय, अग्निवीर योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही सहभाग नोंदवला असल्याचे माओवाद्यांच्या दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे. लोकांच्या आंदोलनात रणनीती आखून सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहनही माओवाद्यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांवरही माओवाद्यांनी टीका केली आहे. माओवाद्यांनी आपल्या दस्तऐवजात धार्मिक अल्पसंख्याकांवर विशेषतः: मुस्लिम, ख्रिश्चनांवर लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले. त्यांच्यासह आदिवासी, दलित, महिला, विद्यार्थी-बुद्धिजीवी वर्गावर दडपशाही सुरू असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना 'अर्बन नक्षल' म्हणून शिक्का मारून त्यांचा छळ सुरू आहे. या सगळ्याला विरोध आंदोलने करण्यात आली असल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. ज्या ठिकाणी ताकद नाही, अशा ठिकाणी सहभाग नोंदवण्यात आला होता. तर, ज्या ठिकाणी माओवादी पक्ष मजबूत आहे, त्या ठिकाणी नेतृत्व केले असल्याचे नक्षलवाद्यांनी त्यांच्या दस्तऐवजात नमूद केले आहे.
सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने देशातील शहरी भागांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड या राज्यांतील शहरी भागात माओवादी आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. या राज्यातील शहरी भागात गनिमी काव्याने जनआंदोलन उभारण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी आपल्या दस्तऐवजात केले आहे. बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंडमधील अनेक शहरी भागांतही नक्षलवाद्यांकडून प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे. नक्षली कारवाया आणि प्रभाव वाढवण्यासाठी मोठी योजना आखण्यात आल्याचे दस्तऐवजात दिसून येत आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवादविरोधी अभियान सुरू असलेल्या ग्रामीण भागातदेखील प्रभाव वाढवण्यास यश आल्याचा दावा करण्यात आलाय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.