रामटेक (जि. नागपूर) : गेल्या कित्येक वर्षांपासून रामटेक (Ramtek) बसस्थानकावर विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. बसेसची (ST) संख्या अतिशय कमी असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि एकंदरीतच नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. विद्यार्थी तर रडकुंडी आले आहे. हे बघून रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) थेट बसस्थानकावर पोहोचले आणि विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.
बसेसची लेटलतिफी, बसेसची कमतरता, वाहकांची उद्दाम वागणूक, यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत यायला रोजच उशीर होतो. बसेसच्या रोज होणाऱ्या त्रासामुळे विद्यार्थी शाळा महाविद्यालयात उशिराने पोहोचतात. आमदार जयस्वाल बसस्थानकावर पोहोचताच विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घालून बसेस संबंधी तक्रारी केल्या. जिल्हा बस नियंत्रक गजानन नागुलवार यांनी येत्या आठ दिवसांत सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदारांना दिल्यानंतरच ते बसस्थानकावरून परत आले.
रामटेक हे तालुक्याचे ठिकाण असून येथे सर्व शाळा आणि महाविद्यालये आहेत. त्यामुळे रामटेकच्या पंचक्रोशीतून विद्यार्थी रामटेकला शिक्षण घ्यायला येतात. सर्व विद्यार्थ्यांना बस हा एकच आणि सोयीस्कर पर्याय आहे. कानाकोपऱ्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने रामटेकला ये-जा करतात. एकूणच विद्यार्थी संख्या लक्षात घेता बसेसची संख्या आणि त्याची वेळ विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सोयीची होईल, अशी असावी अशी अपेक्षा आहे. अलीकडे रामटेक आगाराच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत शाळांच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. शाळांनी आगारांना पत्र दिले, परंतु त्यावर काहीही करण्यात आले नाही. राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी बस स्थानकाला काही दिवसांपूर्वी घेराव देखील केला होता. तरीही आगाराला जाग आली नाही. अखेर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना घेऊन आमदार जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांच्या बसविषयक तक्रारी ऐकण्यासाठी आमदार स्वत: बसस्थानकात दाखल झाले असता विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घालून बसची समस्या मांडली. काही वाहक शिवीगाळ करून बसमधून उतरवून देतात. विद्यार्थी पाहून बस थांबवत नसल्याचे सांगितले.
पासेस काउंटरवर काम करणारे कर्मचारीदेखील उद्दामासारखे बोलतात. शिवीगाळ करतात अशा तक्रारी विद्यार्थी करीत होते. येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याचा सज्जड दम आमदार जयस्वाल यांनी जिल्हा नियंत्रकांना दिला. यावेळी जिल्हा वाहतूक नियंत्रक गजानन नागुलवार, जिल्हा वाहतूक अधिकारी बोबडे, कटरे, आगार व्यवस्थापक भोगे, प्रणय ठाकरे, जि.प.सदस्य संजय झाडे, बिकेंद्र महाजन, शिवसेना शहरप्रमुख धर्मेश भागलकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शरणागत, माजी नगरसेवक राजेश किंमतकर, बंडू सांगोडे उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.