गडकरी म्हणाले, ‘हा’ राज्य सरकारचा विषय, केंद्राचा असता तर मी आत्ता निर्णय घेतला असता..

चिमुकले विद्यार्थी आणि पालक सरसावले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना गळ घालण्यासाठी काल त्यांच्या घरासमोर ‘रस्त्यावरची शाळा’ भरवत अभिनव आंदोलन केले.
Students in front of Nitin Gadkari's Home. 

Students in front of Nitin Gadkari's Home. 

Sarkarnama

Published on
Updated on

नागपूर : फासेपारधी समाजातील एक युवक शासकीय नोकरी सोडून आपल्या समाजातील मुलांना शिकविण्यासाठी सरसावतो. जिवाची बाजी लावून एक आश्रमशाळा उभी करतो आणि समृद्धी महामार्गाच्या कामात त्या शाळेची तोडफोड होते. मग त्या शाळेसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरतात अन् चक्क केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपूरातील (Nagpur) घरासमोर रस्त्यावरच शाळा भरवतात. खुद्द गडकरी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची गाऱ्हाणी ऐकतात. हा प्रसंग काल नागपूरकरांनी अनुभवला.

समृद्धी महामार्गात तोडलेली आश्रमशाळा पुन्हा नव्या वास्तूसह सज्ज व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी ‘जी जान से’ प्रयत्न केले. परंतु मायबाप सरकारसाठी हा ‘चिल्लर’ विषय. ‘हो’ म्हणूनही कुणीच काहीही न केल्याने हतबल झालेल्या मतीनच्या मदतीसाठी त्याचे चिमुकले विद्यार्थी आणि पालक सरसावले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गळ घालण्यासाठी काल त्यांच्या घरासमोर ‘रस्त्यावरची शाळा’ भरवत अभिनव आंदोलन केले.

फासेपारधी समाजासाठी अनेकदा रस्त्यावर उतरणाऱ्या मतीन भोसले यांच्या अनुपस्थितीत हे आंदोलन फासेपारधी समाजाची वाघीण म्हणून परिचित असलेल्या नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या शीला शिंदे यांनी पेलले. जोडीला प्रतिभा धर्मराज भोसले याही होत्या. विद्यार्थ्यांना जण गण गाताना, संविधान प्रास्ताविका वाघरी भाषेत म्हणताना आणि वंदे मातरमच्या सामूहिक घोषणा देताना पाहून वर्धा मार्गावरील गडकरी यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी अत्यंत समंजसपणे परिस्थिती हाताळली. निवेदन देण्यासाठी सामोऱ्या आलेल्या शीला शिंदे, प्रतिभा भोसले यांच्या मागण्या नितीन गडकरी यांनी ऐकल्या. त्यानंतर स्वतःहून खाली बसलेल्या चिमुकल्यांकडे ते गेले. त्यांच्याशी बोलले. ‘‘हे बघा, समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा विषय आहे. केंद्रातील विषय असता तर मी आताच निर्णय घेतला असता. तरीही मी राज्य सरकारला याबाबत पत्र लिहितो.’’ साक्षात गडकरीच बोलल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंदाने टाळ्या वाजविल्या.

<div class="paragraphs"><p>Students in front of Nitin Gadkari's Home.&nbsp;</p></div>
राजकारणात याचं उत्तर कधीच मिळणार नाही...! गडकरी असं का म्हणाले?

अत्यंत शांतपणे निघालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांचा जत्था मग कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रहाटे कॉलनीतील निवासस्थानी गेला. पुन्हा रस्त्यावर शाळा भरली. राष्ट्रगीत, संविधान प्रास्ताविका आदी सर्व आटोपले. नाना पटोले यांच्यावतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना व्हाॅट्स अॅपवर निवेदन पाठविले. ‘या विषयावर नक्कीच बैठक लावण्यात येईल’, असे आश्वासन त्यांना मिळाले. हे अभिनव आंदोलन टिपण्यासाठी आलेल्या कॅमेऱ्यांसमोर मोठ्या हिमतीने विद्यार्थी बोलत होते. त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देत होते. मतीनची कमतरता जाणवू नये, एवढी हिंमत चिमुकले दाखवत होते. इथून पुढे चिमुकल्या आंदोलकांचा जत्था दीक्षाभूमीवर पोहोचला. तिथे बोधीवृक्षाखाली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा छोटेखानी कार्यक्रमही झाला.

दिला इशारा जाता जाता..

सकाळी साडेनऊपासून तब्बल पाच तासानंतर हा क्रांतिकारी जत्था नागभूमीतून अमरावतीकडे रवाना झाला. परंतु ‘मागण्या पूर्ण झाल्या नाही तर लवकरच पुन्हा आंदोलनासाठी येऊ’, असा इशारा जाता जाता देऊन गेला. मतीन भोसले यांचे विद्यार्थी आंदोलन करीत असल्याचे माहीत होताच नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. वासुदेव डहाके, मिलिंद सोनुने, दीनानाथ वाघमारे, रामाजी जोगराणा, बबनराव गोरामन, मुकुंद अडेवार, धीरज भिसीकर, प्रसेनजित गायकवाड आले होते.

प्रमुख मागण्या

- जमीन गेली. ई क्लासची १० एकर जमीन द्या

- शाळेची इमारत पाडली. सुसज्ज इमारत बांधून द्या

- विहीर, कंपाउंड वॉल, वाचनालय आदी बांधून द्या

- झालेली नुकसानभरपाई द्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com