Dr. Parinay Fuke News : काल पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस (Devendra Fadanis) सरकारने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. विरोधक काहीही बोलत असले तरी धान उत्पादकांना मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या घोटाळ्यांना आळा बसणार आहे, असे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) म्हणाले.
पूर्व विदर्भातील भंडारा, (Bhandara) गोंदिया, (Gondia) चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. येथे खरीप आणि रब्बी हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र यावर्षी बियाणे, खते, औषधांच्या किमतीत झालेली वाढ, मजुरीच्या खर्चात झालेली वाढ, डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना पिकांवर जास्त खर्च करावा लागला. याशिवाय पुरामुळे गंभीर आर्थिक संकटातून जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकरी हितासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून या भागातील शेतकऱ्यांना सकारात्मक उपक्रमांच्या मोठ्या अपेक्षा होत्या.
आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट भेटून व पत्र लिहून पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना यंदाच्या २०२२-२३च्या खरीप हंगामासाठी धानावर बोनस देण्याची मागणी केली होती. सरकारने शेतकऱ्यांसाठी सकारात्मक पुढाकार घेत नागपूर अधिवेशनात निर्णायक भूमिका बजावण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाच्या अनुषंगाने शिंदे-फडणवीस सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक पाऊल टाकले आणि काल विधानभवनात धानावर बोनस जाहीर करून आश्वासन पूर्ण केले. आता जिल्ह्यातील ५ लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. ही मर्यादा २ हेक्टरपर्यंत असेल. ऑनलाइन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनस जमा होणार आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके म्हणाले की, सरकारच्या या घोषणेने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्व विदर्भातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. आधीच्या तुलनेत आत्ताची बोनस देण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. बोनसची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे व्यापारी बनावट शेतकरी तयार करून करत असलेला घोळ थांबवता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.