CM : मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे शिळ्या कढीला उत, अजित पवारांचा खोचक टोला..

Ajit Pawr : यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Maharashtra Assembly Winter Session : अंतिम आठवडा, विदर्भ-मराठवाड्यावरील प्रस्तावावर विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांना बगल देत मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) दिलेले भाषण म्हणजे शिळ्या कढीला उतच ठरले, असा खोचक टोला विधान सभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला. राज्य सरकारने धानाला हेक्टरी १५ हजारांचा बोनस जाहीर केला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी प्रति क्विंटल चारशे रुपयेच पडतील. या सरकारने विदर्भातील (Vidarbha) धान उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोपही त्यांनी केला.

विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभेतील कामकाजानंतर परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे नाना पटोले, सुनील केदार व सेनेचे सुनील प्रभू उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या. चार मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीलाही थातूरमातूर उत्तरे देत बगल देण्यात आली. भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत आहे, असे ते म्हणाले.

विदर्भ, मराठवाड्याच्या समस्या, विकासाचे मुद्दे मांडले. परंतु सत्ताधाऱ्यांकडील सदस्यही सरकारच्या उदासिनतेमुळे निराश दिसून आले. धान उत्पादक, सोयाबीन, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतही सरकारने काहीच केले नाही. धान उत्पादकांना आमच्या सरकारने प्रति क्विंटल सातशे रुपये बोनस दिला होता. परंतु या सरकारने हेक्टरी १५ हजारांची घोषणा केली. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना केवळ ४०० रुपये प्रति क्विंटल मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले. दुसरीकडे ३२ आमदारांच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. एका आमदारावर २० लाख रुपये खर्च येणार आहे.

सरकारने ७८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार आहे. कर्नाटक सिमावादावरही सरकारची ठोस भूमिका दिसून आली नाही. प्रामाणिक अधिकाऱ्यांवर राजकीय द्वेशातून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे राज्यातील जनता अपेक्षेने पाहात होती. परंतु त्यांनी तेच जुने, जाहीर सभांमधील भाषण केले. एवढेच नव्हे याला जेलमध्ये टाकणार, कुणाला मोका लावणार, हेच भाषणातून मुख्यमंत्री बोलले. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar
Ajit Pawar Vs Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अजित पवार भडकले

महापुरुषांच्या अवमाननेवर मुख्यमंत्र्यांचे मौन..

भाजपकडून सातत्याने महापुरुषांचा अवमान करण्यात आला. याबाबत मुद्दा मांडून रेकॉर्डवर घेण्यात आले. परंतु मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून या मुद्द्याला बगल दिली. त्यांनी विरोधी पक्षातील लोकांनीही अवमानना केल्याचे थातूरमातूर उत्तर दिले. चर्चा न करता विधेयकेही मंजूर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकार शेतकरीविरोधी..

शेतकऱ्यांना मदतीची केवळ आकडेमोड सरकारने केली. विदर्भातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु सरकारने अधिवेशनावर होणाऱ्या दीडशे ते दोनशे कोटींच्या खर्चाएवढीही मदत शेतकऱ्यांना दिली नाही, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी केला. सूरजागड प्रकल्पातील उद्योगपती दिल्लीच्या मदतीने आले असून स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com