मुंबई : शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली, त्यांना गाड्यांखाली चिरडले. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. आज प्रत्यक्षात मोदींच्या (Narendra Modi) सभेला गर्दीच जमली नाही, सभास्थळी रिकाम्या खुर्च्या होत्या. त्यामुळे सुरक्षेचे कारण पुढे करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा तर ‘तोंड पुरले नाही म्हणून द्राक्ष आंबट आहेत’, असे म्हणण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.
पंतप्रधानांचा ताफा अडवल्याविषयी प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता ‘मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज उगवले’, असे नाना पटोले म्हणाले. पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा असते, पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नियोजित कार्यक्रमानुसार ते हेलिकॉप्टरने सभेला जाणार होते परंतु अचानक त्यात बदल करून ते रस्ते मार्गाने निघाले. पंजाबमध्ये आधीपासूनच शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. भाजप व नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, याची त्यांना जाणीव असेलच. मोदींच्या सभेला गर्दी जमली नाही. त्यामुळे त्यांना सभा रद्द करावी लागली. पण खोटी माहिती पसरवून सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपकडून खटाटोप केला जात आहे.
सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा कांगावा करत पंजाबमधील काँग्रेस सरकारवर दोष देण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सुरक्षेचाच मुद्दा विचारात घेतला तर गांधी कुटुंबाच्या जीविताला नेहमीच धोका राहिला आहे. या कुटुंबाने देशासाठी इंदिराजी व राजीवजींच्या रूपाने दोन बलिदानं दिली आहेत. तरीही सोनिया गांधी, राहुल गांधी जनतेत सामील होतात, सुरक्षेची चिंता न करता सामान्य लोकांमध्ये मिसळतात. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला झाला होता.
उत्तर प्रदेशातील पीडित कुटुंबाला भेटण्यास जाताना राहुलजी गांधी व प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेची काय परिस्थिती होती? प्रियंका गांधी यांच्याशी पुरुष पोलिसांनी धक्काबुक्की केली होती, हे भाजपवाले विसरले काय? त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कोणी केली होती? कोणाच्या इशाऱ्यावर राहुल व प्रियंका गांधी यांना अडवण्यात आले होते, याचे उत्तरही भाजपने द्यावे, असे नाना पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.